Breaking-newsमुंबई
अंधेरीतील लोखंडवाला संकुलात दोन संशयास्पद मृत्यू
मुंबई – अंधेरीतील लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये दोन जणांचे संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली. एका फॅशन डिझायनरचा मृतदेह गुरुवारी तिच्याच घरात सापडला. तर दुसऱ्या घटनेत मोलकरणीचे काम करणारी वीस वर्षीय तरुणी इमारतीखाली मृतावस्थेत पडलेली आढळली. या घटनेचा तपास ओशिवरा पोलीस करत आहे.
४६ वर्षीय सुनीता सिंग या आपल्या मुलासह लोखंडवाला येथील क्रॉस गेट इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर राहत होत्या. गुरुवारी दुपारी त्या बेडरूममध्ये मृतावस्थेत आढळल्या. याची माहिती मिळताच ओशिवरा पोलीस घटनास्थळी पोहोचले. यावेळी सिंग यांच्या मृतदेहाशेजारीच इंजेक्शनच्या काही सिरिंज सापडल्या. शवविच्छेदनासाठी त्यांचा मृतदेह रुग्णालयात पाठविला असून त्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण समजू शकणार आहे, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
सुनीता यांचा मुलगा एका तरूणीसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये याच फ्लॅटमध्ये राहतो. त्यांचा मुलगा व तरूणीकडे पोलिस कसून चौकशी करत आहेत. त्यानंतर लोखंडवालामधीलच स्काय गार्डन या इमारतीमध्ये मोलकरणीचे काम करणाऱ्या एका वीस वर्षीय तरूणीचा मृतदेह इमारतीच्या सुरक्षारक्षकाला आढळला. हा मृतदेह इमारतीजवळच पडला होता. या अपघातामागीलही नेमक्या कारणाचा पोलीस शोध घेत आहेत.