मनसेचा युटर्न? कोकण पदवीधर निवडणुकीतून मनसेची माघार
![MNS withdrawal from Konkan graduate elections](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/06/Raj-Thackeray-780x470.jpg)
मुंबई | विधानपरिषदेच्या पदवीधर मतदारसंघांची निवडणूक सध्या सुरु आहे. या निवडणुकीत कोकण मतदारसंघातून मनसेकडून अभिजीत पानसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. तर भारतीय जनता पक्षाकडून निरंजन डावखरे यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, भाजप नेत्यांच्या मनधरणीनंतर राज ठाकरे यांनी युटर्न घेतल्याची माहिती समोर आली आहे. मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना याबाबत माहिती दिली.
मनसे नेते नितीन सरदेसाई म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्या भेटीत त्यांनी राज ठाकरे यांना विनंती केली होती. त्यानंतर त्यांच्या विनंतीला मान देऊन अभिजीत पानसे हे उमेदवारी अर्ज भरणार नाहीत, असा निर्णय राज ठाकरे यांनी घेतला आहे. फक्त निरंजन डावखरे हे उमेदवार असतील, असं ठरलं आहे. देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांच्याकडे येऊन गेल्यानंतर पुन्हा एकदा ते दोनदा या विषयावर चर्चा झाली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
हेही वाचा – देवेंद्र फडणवीस यांचा फैसला दिल्लीत, तर मग गृहमंत्री कोण?
मनसे या निवडणुकीतही भाजपाला बिनशर्त पाठिंबा देणार का? असा प्रश्न नितीन सरदेसाई यांना विचारण्यात आला असता ते म्हणाले, याबाबत राज ठाकरे स्वत: बोलणार आहेत. मात्र, अशी गोष्ट वारंवार होणार नाही, असंही राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं आहे, असं ते म्हणाले.