breaking-newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तकमहाराष्ट्र

दहावीच्या विद्यार्थ्यांचे होणार मूल्याकंन; अकरावी प्रवेशाबाबत सरकारने दिली माहिती

मुंबई |

करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्य सरकारने यंदा दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने सरकारच्या या निर्णयावर प्रश्न उपस्थित करत फटकारले होते. उच्च न्यायालयाने परीक्षा घेण्याबाबतही विचारणा केली होती. मात्र, राज्य सरकारनं परीक्षा न घेण्याची भूमिका कायम ठेवली होती. पण, तरीही परीक्षा विद्यार्थी आणि पालकामंध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झालेलं होतं. मात्र, अखेर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी संभ्रम दूर केला असून, दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निकालासंदर्भात आणि अकरावीच्या प्रवेशाबद्दलची प्रक्रिया जाहीर केली. दहावीच्या निकालासाठी १०० टक्के गुणांपैकी ५० टक्के गुणांचे वेटेज दहावीच्या अंतर्गत मूल्यमापनावर तर ५० टक्के गुणांचे वेटेज नववीच्या अंतिम परीक्षेच्या गुणांना देऊन विद्यार्थ्यांचे मूल्यमापन केले जाणार आहे.

वर्षा गायकवाड म्हणाल्या, “ राज्यातील करोना संसर्गामुळे मागील वर्षभरापासून आपल्या सर्वांसमोर अनेक आव्हानं निर्माण झालेली आहेत. शिक्षण क्षेत्रातही खूप मोठ्याप्रमाणावर आव्हानं आलेली आहेत. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये आपण वर्षभर विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन, ऑफलाइन अध्यापन यासाठी आपण वर्षभर विविध उपक्रम राबवले आहेत. करोना प्रादुर्भावामुळे मार्च-२०२१ पासून इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी प्रविष्ट असलेले विद्यार्थी, पालक व परीक्षेसंदर्भात काम करणारे घटक या सर्वांचे आरोग्य ही आमची सगळ्यात महत्वाची प्राथमिका आहे, हे आम्ही सातत्याने सांगत आलेलो आहोत. म्हणूनच राज्य शिक्षण मंडळाच्यावतीने आयोजित केलेली इय़त्ता दहावीची परीक्षा रद्द करण्यासंदर्भातील निर्णय आम्ही, राज्य मंत्रिमंडळाने घेतला होता. त्यानुसार राज्य शासनाने शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये इयत्ता दहावी वर्षासाठी प्रविष्ट असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे, सरकट उत्तीर्ण करण्यास संदर्भातील परवानगी दिली होती.”

  • विद्यार्थ्यांचे प्रत्येक विषयाचे १०० गुणांचे मुल्यमापन –

“ करोनामुळे उद्भवलेल्या असमान्य परिस्थितीत सर्वसमावेशक असे धोरण तयार करताना मी सांगू इच्छिते की, शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी, मुख्याध्यापक, शिक्षक, लोकप्रतिनिधी, पालक संघटना, तंत्रज्ञान कंपन्या यांच्यासोबत सुमारे २४ विविध बैठकांद्वारे चर्चा करण्यात आली. या सर्वांशी सखोल चर्चा करून इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना गुणदान करण्याबाबतचे धोरण आम्ही निश्चित केले आहे. सदर मूल्यमापन धोरणानुसार, विद्यार्थ्यांचे प्रत्येक विषयाचे १०० गुणांचे मुल्यमापन करण्यात येईल.”

यामध्ये, “ इयत्ता नववी व इयत्ता दहावीसाठी सुधारित मूल्यामापन योजोना शासन निर्णय दि.८ ऑगस्ट २०२० नुसार मूल्यमापन योजना निश्चित करण्यात आली आहे. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी इयत्ता दहावी परीक्षेचा अंतिम निकाल खालील निकषांच्या आधारे निश्चित करण्यात येईल.
१. विद्यार्थ्यांचे इयत्ता दहावीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन ३० गुण
२.विद्यार्थ्यांचे इयत्ता दहावीचे गृहपाठ/ तोडीं परीक्षा/ प्रात्याक्षिक परीक्षा यांच्या आधारे अंतर्गत मूल्यमापन २० गुण
३.विद्यार्थ्यांचा इयत्ता नववीचा विषय निहाय अंतिम निकाल ५० गुण
या प्रमाणे विषयनिहाय एकूण १०० गुण (इयत्ता नववी संपादणूक यासाठी ५० टक्के भारांश व इयत्ता दहावी संपादणूनक यासाठी ५० टक्के भारांश )

  • कोविड-१९ पूर्व काळातील संपादणूक पातळीही विचारात घेतली गेली –

“ सदर मूल्यमापन धोरण करताना विद्यार्थ्यांची कोविड-१९ पूर्व काळातील संपादणूक पातळीही विचारात घेतली गेली आहे. सध्या इयत्ता दहावीत असलेल्या विद्यार्थ्यांच्या मागील वर्षीचा (इयत्ता नववीचा) निकाल कोविडपूर्व वस्तुनिष्ठ मूल्यमापनावर आधारित आहे. सरल प्रणालीवर सदर निकालाची नोंद आहे. ज्या विद्यार्थ्यांना वरील पद्धतीने तयार केलेला निकाल समाधानकारक वाटत नसेल त्यांना कोविड १९ ची परिस्थिती सामान्य झाल्यानंतर मंडळाच्या प्रचलित पद्धतीनुसार श्रेणीसुधार योजनेअंतर्गत यापुढील लगतच्या दोन परीक्षांमध्ये प्रविष्ट होण्याची संधी उपलब्ध असेल.”

  • जून २०२१ अखेर निकाल घोषित करण्याचे नियोजन –

“ विद्यार्थ्यांच्या निकालाचे नियमन करण्यासाठी शाळास्तरावर मुख्याध्यापकांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यांची निकाल समिती असेल, या निकालपत्रांच्या अभिलेखांची पडताळणी विभागीयस्तरावर शालेय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यंकडून करण्यात येईल. शाळास्तरावर गैरप्रकार अथवा अभिलेख यामध्ये फेरफार झाल्यास शिस्तभंग व दंडात्मक कारवाई याची तरतूद करण्यात आली आहे. मंडळामार्फत जून २०२१ अखेर निकाल घोषित करण्याचे नियोजन आहे. त्याकरिता विद्यार्थ्यांची मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वेळापत्रक मंडळामार्फत लवकरच जाहीर करण्यात येईल. सर्व शाळांनी या वेळापत्रकाचे तंतोतंत पालन करावे.”

  • इय़त्ता अकरावी प्रवेशासाठी वैकल्पिक सीईटी –

“ पुनर्परीक्षार्थी (रिपीटर), खासगी (फॉर्म – १७), तुरळक विषय घेऊन बसणारे विद्यार्थी यांच्यासाठी देखील मूल्यमापन धोरण निश्चित केले आहे. श्रेणीसुधार योजने अंतर्गत बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी त्यांना लागू असलेल्या पुढील एक किंवा दोन संधी अबाधित राहतील. राज्यातील इयत्ता दहावी परीक्षेसाठी बसलेल्या सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांचा विचार आम्ही सदर धोरण तयार करताना केला आहे. विविध परीक्षा मंडळानी या वर्षीच्या इय़त्ता दहावी निकालासाठी शाळास्तरावर होणारे अंतर्गत मूल्यमापन विचारात घेतल्याने इयत्ता अकरावी प्रवेशासाठी एकवाक्यता राहण्याच्या दृष्टीने व सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी यासाठी आम्ही इय़त्ता अकरावी प्रवेशासाठी वैकल्पिक सीईटी घेणार आहोत. सदर प्रवेश परीक्षा मंडळाच्या इयत्ता दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. सदर १०० गुणांच्या परीक्षेसाठी बहुपर्यायी प्रश्न असतील व ओएमआर पद्धतीने दोन तासांची परीक्षा घेण्यात येईल.”

  • विद्यार्थ्यांना सीईटीतील गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्राधान्य –

“ इयत्ता अकरावी प्रवेश परीक्षा राबविताना सामाईक प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना सामाईक प्रवेश परीक्षेतील गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्राधान्य देण्यात येईल. सामाईक प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशानंतर, कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये रिक्त राहिलेल्या जागा ज्या विद्यार्थांनी सामाईक प्रवेश परीक्षा दिलेली नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी खुल्या असतील व त्या जागांवर सामाईक प्रवेश परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीच्या मूल्यमापन पद्धतीनुसार मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येईल.”

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button