अर्णब गोस्वामीविरुद्ध हक्कभंग आणून खळबळ माजवणारे सरनाईक हतबल का झाले? – खासदार संजय राऊत
![Why did Sarnaik, who was agitating against Arnab Goswami, get upset? - MP Sanjay Raut](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/06/sanjay-Raut-pratap-sarnaik-.jpg)
मुंबई |
शिवसेनेचे प्रवक्ते आणि आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केंद्रीय तपास यंत्रणांकडून होत असलेल्या त्रासाबद्दलची खदखद व्यक्त केली. केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा थांबवण्यासाठी भाजपाशी आणि नरेंद्र मोदी यांच्याशी जुळवून घ्या, असं विनंती सरनाईक यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. सरनाईक यांच्या पत्राने राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. दरम्यान, सरनाईक यांनी उद्धव ठाकरेंना लिहिलेलं पत्र आणि त्यानंतर सुरू झालेल्या चर्चा या सगळ्यांवरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपा आणि मोदी सरकारचा समाचार घेतला आहे. काही सवाल उपस्थित करत राऊतांनी भाजपाला धारेवर धरलं.
खासदार संजय राऊत यांनी रोखठोक सदरातून सरनाईक यांनी लिहिलेल्या पत्रावर आणि सध्या अनिल देशमुख यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या कारवाई रोखठोक भूमिका मांडली आहे. “ईडीचे अधिकारी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुंबई-नागपुरातील घरांत घुसले आहेत. केंद्रीय पोलिसांच्या मोठ्या पथकाने देशमुख यांच्या घरांना वेढा दिला आहे. देशमुख हे जणू चंबळ खोऱ्यातील डाकू आहेत अशा पद्धतीने ‘ईडी’ने ही कारवाई केली. महाराष्ट्राच्या स्वायत्ततेवर हा सरळ आघात आहे. एका बाजूला प्रताप सरनाईक, दुसऱ्या बाजूला अनिल देशमुख हे दोघेही विधानसभेचे सदस्य. देशमुख हे कालपर्यंत राज्याचे गृहमंत्री होते. महाराष्ट्र सरकारच्या नाकावर टिच्चून ‘ईडी’ केंद्रीय पोलिसांच्या मदतीने हे सर्व करीत आहे. ईडी किंवा सीबीआयची निर्मिती पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रासाठीच झाली की काय असे वाटावे इतके सर्व या दोन राज्यांत घडवले जात आहे,” अशी टीका राऊत यांनी केली.