पुण्यात कोण तुमचं ऐकत नाही आणि तुम्ही…; निलेश राणेंचं उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीकास्त्र
![Who in Pune does not listen to you and you…; Nilesh Rane castigates Deputy Chief Minister Ajit Pawar](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/ajit-pawar-nilesh-rane-tika.jpg)
मुंबई |
महाराष्ट्रावर करोनाचं संकट अधिक गडद होताना दिसत आहे. राज्यात दररोज ६० हजारांच्या आसपास रुग्ण आढळून येत आहे. त्यामुळे राज्य सरकारने कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला. मात्र, या निर्बंधांचंही पालन नागरिकांकडून होत नसल्याचं दिसत आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागच्या वर्षीसारखा लॉकडाउन लावण्याचा इशारा दिला आहे. त्यावरून माजी खासदार निलेश राणे यांनी अजित पवारांवर टीका केली आहे. उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी शहर आणि जिल्ह्यातील करोना परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर अजित पवार यांनी वीकेंड लॉकडाउनबद्दल भाष्य केलं होतं.
लोकांनी दोन दिवसांचा लॉकडाउन पाळला नाही, तर मागच्या वर्षीसारखा लॉकडाउन आणावा लागेल, असं मंत्रिमंडळातील सहकारी म्हणत असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं होतं. अजित पवार यांच्या या विधानावरूनच निलेश राणे यांनी टीकास्त्र डागलं आहे. “अजित पवार आपण रोज उठून लॉकडाउनची धमकी देता, पण पुण्याचे आपण पालकमंत्री आहात तिथे परिस्थिती सर्वात गंभीर आहे. पुण्यात कोण तुमचं ऐकत नाही आणि धमकी तुम्ही महाराष्ट्राला देता. नेतेगिरी कामात दाखवा साहेब, लोकांचे जीव वाचतील. लॉकडाउन हा फक्त एक पर्याय आहे, उपाय नाही,” अशी टीका निलेश राणेंनी केली आहे.
अजित पवार आपण रोज उठून लॉकडाऊनची धमकी देता पण पुण्याचे आपण पालकमंत्री आहात तिथे परिस्थिती सर्वात गंभीर आहे, पुण्यात कोण तुमचं ऐकत नाही आणि धमकी तुम्ही महाराष्ट्राला देता. नेतेगिरी कामात दाखवा साहेब, लोकांचे जीव वाचतील, लॉकडाऊन हा फक्त एक पर्याय आहे, उपाय नाही.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) April 16, 2021
अजित पवार नेमकं काय म्हणाले होते?
“पुणेकरांनी मागच्या आठवड्यात शनिवार, रविवारच्या लॉकडाउनला चांगला प्रतिसाद दिला होता. तेव्हा मी त्यांचं कौतुक केलं. आताही शनिवार, रविवार दोन दिवस पुणेकर हीच गोष्ट दाखवतील. एकंदरित मागच्यावेळी लॉकडाउन होतं तेव्हा आपण खूप मोठा काळ थांबलो. मात्र, दुसऱ्या लाटेत पहिल्या लाटेपेक्षा करोना बाधितांची संख्या वाढली आहे. त्यामुळे कठोर वाटतील असे निर्णय घेण्याची वेळ आली. म्हणूनच नागरिकांनी सहकार्याची भूमिका घ्यावी. गुरुवारी (१५ एप्रिल) माझ्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनीही सांगितलंय की दोन दिवसांचा लॉकडाउन पाळला नाही, तर मागच्या सारखा कडक लॉकडाउन आणावा लागेल, तशी वेळ येऊ नये अशी विनंती आहे,” असं अजित पवार म्हणाले होते.