काँग्रेसच्या आमदारांनी सोनियांना भेटण्यात गैर काय?; लहू कानडे यांचा सवाल
![What's wrong with Congress MLAs meeting Sonia ?; Question by Lahu Kanade](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/04/Whats-wrong.jpg)
अहमदनगर | काँग्रेसचे आमदार ५ व ६ एप्रिलला दिल्लीला जाणार हे खरं आहे. मात्र, ते फक्त सोनिया गांधी यांना भेटण्यासाठी नव्हे तर तिथं आयोजित करण्यात आलेल्या एका प्रशिक्षणासाठी जाणार आहेत. तिथं गेल्यावर पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेतली तर गैर काय?, असा सवाल काँग्रेसचे श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे यांनी केला. हे आमदार मंत्र्यांवर नाराज असल्याची बातम्या त्यांनी फेटाळून लावल्या.
श्रीरामपूरमध्ये माजी सैनिकांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात आमदार कानडे बोलत होते. यावेळी त्यांनी सध्या सुरू असलेल्या चर्चेचं खंडण केलं. काँग्रेसचे आमदार नाराज असून त्यांनी सोनिया गांधींकडं भेटीची वेळ मागितली आहे, अशी चर्चा सध्या सुरू आहे. या पत्रावर सही असणाऱ्या आमदारांमध्ये कानडे यांचाही समावेश असल्याची चर्चा आहे.
त्यामुळं कानडे यांनी कार्यक्रमाच्या निमित्तानं बोलताना यावर स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला आहे. ते म्हणाले, ‘काँग्रेसचे आमदार नाराज असल्याची चर्चा चुकीची आहे. प्रत्यक्षात हे आमदार दिल्लीला प्रशिक्षणासाठी जाणार आहेत. संसदेच्या ‘पार्लमेंटरी रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट फॉर डेमॉक्रसीस’ या संस्थेमार्फत हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं आहे. दिल्लीत पाच व सहा एप्रिलला हे प्रशिक्षण होणार आहे. राज्यातील २५ सदस्य यात सहभागी होणार आहेत. दिल्लीला जातच आहोत, तर सोनिया गांधी यांची भेट घेऊ असा प्रयत्न आहे. त्यात गैर काहीच नाही. मात्र, त्यावरून हे आमदार नाराज असल्याची खोटी चर्चा पसरविली जात आहे. वस्तविक पहाता नाराजी नाही. नाराजीचं कारणही नाही. श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचंच उदाहरण द्यायचं झालं तर या माझ्या मतदारसंघात ३०० कोटींची विकास कामं सुरू आहेत. इतर आमदारांच्याकडंही विविध कामं सुरू आहेत,’ असेही त्यांनी सांगितलं.