“मराठीशिवाय कोणतीही भाषा आम्ही लादून घेणार नाही”; उद्धव ठाकरे आक्रमक

मुंबई : राज्यात पुन्हा एकदा मराठी विरुद्ध हिंदी वाद चिघळण्याची चिन्हं दिसत आहेत. प्राथमिक शाळांमध्ये म्हणजेच पहिली ते चौथी इयत्तांपर्यंत हिंदी भाषा सक्तीने तिसऱ्या भाषेप्रमाणे शिकविण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात शिवसेना (ठाकरे गट) आक्रमक झाली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल करत हिंदी भाषेच्या सक्तीला तीव्र विरोध दर्शवला आहे.
या मुद्यावर ठाकरे यांच्या निवासस्थानी ‘मातोश्री’वर महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ. दीपक पवार आणि समन्वय समितीचे सदस्य उपस्थित होते. बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.
ठाकरे म्हणाले, “मराठीशिवाय कोणतीही भाषा आम्ही लादून घेणार नाही. सरकारने हिंदी भाषा सक्ती थांबवावी. ही अघोषित हुकूमशाही आणि भाषिक आणीबाणी आहे. आम्ही २९ जूनला जाहीर सभा घेणार असून, या सभेत सरकारच्या निर्णयाची होळी केली जाईल.”
ते पुढे म्हणाले, “आमचा हिंदी भाषेला विरोध नाही, पण तिच्या सक्तीला आहे. ही भाषा लादली जात असेल, तर तो विरोध अधिक तीव्र होईल. ‘बाटेंगे तो काटेंगे’ हे धोरण केंद्र सरकारचे आहे. आम्ही आमच्या मुलांवर अशी सक्ती होऊ देणार नाही. हिंदी भाषा आली नाही, तर जगणं थांबत नाही,” असा स्पष्ट संदेश ठाकरे यांनी दिला.
हेही वाचा – आता दुचाकींनाही टोल; ‘या’ मार्गांवरून जाण्यासाठी मोजावे लागणार पैसे
या भाषणादरम्यान ठाकरे यांनी आंदोलनाचा इशाराही दिला. “२९ जूनला सभा आणि ७ जुलैला मोर्चा काढण्यात येणार आहे. पक्षीय भेद विसरून सर्व मराठी माणसांनी एकत्र यावं. मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार, साहित्यिक, खेळाडू – सगळ्यांनी मराठीसाठी पुढं यावं,” असे आवाहन त्यांनी केलं.
भाजपवर टीका करताना ते म्हणाले, “भाजपमध्ये अस्सल मराठी माणसं आहेत, पण त्यांना शोधणं संशोधनाचा विषय आहे. मी एक मराठी माणूस म्हणून सर्वांना एकत्र येण्याचं आवाहन करतो,” असे त्यांनी ठणकावून सांगितले.
या पार्श्वभूमीवर मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा एकदा राज्यात जोरात चर्चेत येण्याची शक्यता आहे. मनसेनेही याच विषयावर ६ जुलैला मोर्चा जाहीर केला असून, शिवसेना ठाकरे गटाचा मोर्चा ७ जुलैला होणार आहे. त्यामुळे पुढील काही दिवस राज्याचे राजकीय वातावरण अधिकच तापलेले दिसण्याची चिन्हे आहेत.




