“खरा सचिन वाझे मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर होता की सिल्वर ओकवर?”
![If the ruler himself is a ransom seeker, then; Bhatkhalkar criticizes Thackeray government over Sangli incident](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/04/uddhav-and-atul-bhatkhalkar.jpg)
मुंबई |
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांमुळे गृहमंत्रीपदावरून पायउतार व्हाव्या लागलेल्या अनिल देशमुख यांच्याविरुद्ध सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय त्यांच्या नागपुरमधील घरावर देखील छापा मारण्यात आला आहे. या कारवाईवरून भाजपा नेत्यांकडून आता महाविकासआघाडी सरकारवर निशाणा साधला जात आहे. भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी, “खरा सचिन वाझे मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर होता की सिल्वर ओकवर? असा प्रश्न उपस्थित करत, खंडण्या वसूल करणारा खरा सचिन वाझे कोण हे आता उघड होईलच…”असं म्हणत टीका केली आहे.
अतुल भातखळकर यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे की, “सीबीआयने अनिल देशमुखांवर एफआयआर दाखल केला, हे अतिशय स्वागतार्ह आहे. आता या प्रकरणातील खरा सचिन वाझे कोण हे महाराष्ट्राच्या जनतेसमोर आलं पाहिजे! माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर FIR दाखल, घरावर सीबीआयचे छापे पडले असून निवासस्थानासह १० ठिकाणी सीबीआयच्या पथकांच्या धाडी. ना खाऊंगा ना खाने दूंगा हेच मोदी सरकारचे सूत्र आहे.”
सीबीआयने अनिल देशमुखांवर एफआयआर दाखल केला, हे अतिशय स्वागतार्ह आहे. आता या प्रकरणातील खरा सचिन वाझे कोण हे महाराष्ट्राच्या जनतेसमोर आलं पाहिजे !
– @BhatkhalkarA @AnilDeshmukhNCP pic.twitter.com/e0n0ESFyiI— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) April 24, 2021
तसेच, “खंडण्या वसूल करणारा खरा सचिन वाझे कोण हे आता उघड होईलच…खरा सचिन वाझे मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर होता की सिल्वर ओकवर? अनिल देशमुखांवर झालेली कारवाई म्हणजे भ्रष्ट आणि सूडबुद्धीने राबवलेल्या सत्तेचे स्वाभाविक परिणाम. एका अनिलवर कारवाई पुरेशी नाही.” असं देखील भातखळकर म्हणाले आहेत.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर FIR दाखल, घरावर सीबीआयचे छापे पडले असून निवासस्थानासह १० ठिकाणी सीबीआयच्या पथकांच्या धाडी.
ना खाऊंगा ना खाने दूंगा हेच मोदी सरकारचे सूत्र आहे. pic.twitter.com/S9ULQpUVlb— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) April 24, 2021
याचबरोबर, “१०० कोटींचे वसुली आरोप असणाऱ्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयने एफआयआर दाखल केले आहे. वसुलीच्या आरोपानंतर समाज माध्यमांसमोर उघडपणे अनिल देशमुख यांची बाजू मांडणाऱ्यांच्या तोंडावर ही मोठी चपराक असून ते यातून नक्की काहीतरी बोध घेतली अशी आशा आहे.” असं भाजपाकडून ट्विट करण्यात आलेलं आहे.
अनिल देशमुखांवर झालेली कारवाई म्हणजे भ्रष्ट आणि सूडबुद्धीने राबवलेल्या सत्तेचे स्वाभाविक परिणाम.
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) April 24, 2021
प्रकरण काय आणि आज काय घडलं?
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकं प्रकरणात निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली. त्यानंतर या प्रकरणावरून बराच गदारोळ सुरू झाल्यानंतर मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून तत्कालीन आयुक्त परमबीर सिंह यांची उचलबांगडी करण्यात आली होती. सिंह यांच्याकडून तपास चुका झाल्याचं विधान अनिल देशमुख यांनी केल्यानंतर सिंह यांनी लेटरबॉम्ब टाकला. सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एक पत्र पाठवलं होतं. ज्यात अनिल देशमुख यांनी १०० कोटी वसूलीचं टार्गेट दिलेलं होतं, असा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी परमबीर सिंह यांनी आधी सर्वोच्च न्यायालय आणि नंतर मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर सीबीआयने प्रकरणाचा तपास सुरू केला. परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपाप्रकरणी सीबीआयने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह या प्रकरणातील संबंधित इतरांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. आहे. तसंच प्रकरणाच्या तपासाच्या अनुषंगाने काही ठिकाणी सीबीआयकडून झाडाझडतीही सुरू करण्यात आली आहे.
वाचा- राजकीय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी देशमुखांवर धाडसत्र; जयंत पाटील यांनी सुनावलं