#WAR AGAINST CORONA: सूचनांचे पालन करा… इतर देशांचे चित्र भयावह : शरद पवार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/3-6.jpg)
मुंबई । महाईन्यूज । प्रतिनिधी
देशात लॉकडाऊन जाहीर झाले त्याचा आजचा हा तेरावा दिवस आहे. अजून आठ दिवस बाकी आहेत. या उर्वरित दिवसांत ज्या सूचना केल्या आहेत त्यांचे तंतोतंत पालन करणे गरजेचे आहे. इतर देशांचे चित्र पाहिल्यास ते अधिक भयावह आहे, अशी भूमिका राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि खासदार शरद पवार यांनी मांडली आहे.
पवार यांनी सोशल मीडियावर सविस्तरपणे भावना व्यक्त केल्या आहेत. पवार यांनी म्हटले आहे की, केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात ४०६७ कोरोना केसेस आहेत. त्यापैकी ३७६६ केसेस अॅक्टिव्ह आहेत. त्यांची काळजी वैद्यकीय क्षेत्रातील लोक काटेकोरपणे घेत आहेत. देशात ११८ मृत्यू झाले असून ३२८ रुग्ण बरे होऊन घरीदेखील गेले आहेत.
त्यामुळे आपण योग्य काळजी घेतली तर इतर रुग्णांनाही या आजारातून बाहेर काढू शकतो. यासाठी सरकारने केलेल्या सूचनांचे कटाक्षाने पालन करूया.
या सगळ्या परिस्थितीत सर्व समाजाला एकत्र राहण्याची गरज आहे. जात-धर्म न पाहता एक सामाजिक सलोखा सगळ्यांनी जपण्याची आवश्यकता आहे. सोशल मीडियावर सध्या जे मेसेजेस येत आहेत त्यातून अफवा पसरवण्याचे काम मोठ्या प्रमाणावर होतेय.
****
सोशल मीडियावरील मॅसेजबाबत जागरुक रहा…
विशेषतः व्हॉटसअॅपवर येणाऱ्या मेसेजेसबाबत अधिक जागरूक राहण्याची गरज आहे. यातील पाचपैकी चार मेसेज हे खोटे असतात. त्यामुळे समाजात गैरसमज निर्माण करण्याचे कोणाचे प्रयोजन आहे का अशी शंका येते.या संकटाच्या काळात हजरत निजामुद्दीनमधील मरकजसारखे संमेलन होण्याची आवश्यकता नव्हती. महाराष्ट्रातदेखील असा कार्यक्रम घेण्याची मागणी केली होती. मात्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही परवानगी नाकारली. हीच भूमिका दिल्लीत घेतली गेली असती तर सांप्रदायिक तेढ वाढण्याची संधी मिळाली नसती.इथे देखील असे प्रकार घडले आहेत. सोलापुर जिल्ह्यातील घेरडी या गावी बैल व घोडा शर्यतींच्या निमित्ताने हजारो लोक एकत्र आले. पण या आयोजकांवर पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई केली. तशीच कारवाई दिल्लीत होणे गरजेचे होते. तसेच दिल्लीत जे घडले ते रोज टीव्हीवर दाखवणे गरजेचे आहे का याचाही जाणकारांनी विचार करावा. पुढील काळात दोन महत्त्वाच्या गोष्टी आपल्यासमोर आहेत. त्या म्हणजे देशाच्या अर्थकारणावर व समाजाच्या आरोग्यावर होणारा विपरित परिणाम. कोरोनाच्या संकटाचा परिणाम अनेक घटकांवर होणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.
****
आर्थिक परिस्थितीची काळजी घेतली पाहिजे…
रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचे मत आहे की पुढील काळात रोजगार कमी होऊन, बेरोजगारी वाढण्याचे संकट हे फार मोठे असणार आहे. यासाठी मी राज्याचे मा. मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांना विनंती केली आहे की, पुढील काळात तज्ज्ञ, जाणकार लोकांना एकत्र आणून उपाययोजनांची चर्चा करावी. पुढील वर्षभरात आर्थिक परिस्थितीची काळजी घ्यायला हवी. विजय केळकरांसारख्या जबाबदार व्यक्तींना सोबत घेऊन आपण परिस्थितीत बदल करू शकतो. केंद्र सरकारकडून देखील काही गोष्टींची राज्याला निश्चितच अपेक्षा आहे. केंद्राने राज्याला आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी मदत म्हणून पॅकेज जाहीर करण्याची गरज आहे.
***
शेती व्यावसायाला मार्गदर्शन व्हावे…
शेती व्यवसायाला देखील योग्य प्रकारचे मार्गदर्शन करण्याची गरज आहे. आपल्या देशात गव्हाचे उत्पादन उत्तरेकडे व तांदळाचे दक्षिण भारतात होते. आता रब्बी हंगाम पूर्ण होत आहे. शेतात पिके उभी आहेत. जर ती काढली नाहीत तर त्याचा परिणाम शेती अर्थव्यवस्थेवर व शेतकऱ्यांवर होईल. याकडे केंद्र सरकारने लक्ष द्यायला हवे. लोकांना एकत्रित येण्यासाठी काही सण वा प्रसंग कारणीभूत ठरतील का, याची काळजी आतापासून घेणे गरजेचे आहे. आज महावीर जयंती आहे, ८ तारखेला शब-ए-बारातचा कार्यक्रम आहे, सर्वांनी घरी थांबूनच हे कार्यक्रम संपन्न करावेत, घरूनच आपली प्रार्थना करावी, अशी विनंतीही पवार यांनी केली आहे.
***
एक दिवा ज्ञानाचा लावून फुले जयंती साजरी करु!
येत्या ११ एप्रिलला महात्मा फुले जयंती आहे. जोतिबा फुले यांनी समाजात ज्ञान वाढवण्याचे काम केले. आपण एक दिवा ज्ञानाचा लावून हा दिवस घरी राहून साजरा करूया. तसेच १४ तारखेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे, यादिवशी एक दिवा संविधानाचा लावून डॉ. आंबेडकरांचे स्मरण करूया. गर्दी टाळून या संकटावर मात करूया. महात्मा जोतिबा फुले यांनी कधीच अंधश्रद्धेचे समर्थन केले नाही. अंधश्रद्धा ही माणसाला दैववादी बनवते. यातून चिकित्सेचा मार्ग थांबतो. काहीही झाले तरी माणसाने दैववादी होऊ नये. माणसाचे सदैव चिकित्सक असले पाहिजे. ज्ञानाचे समर्थन करण्याची भूमिका स्वीकारावी. या रस्त्याने जाण्याचा आपण निर्धार करू. तसेच, सध्या आपणा सर्वांना एक निश्चय करायचा आहे. देशाचे मा. पंतप्रधान, राज्याचे मा. मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून कोरोनावर मात करायची आहे. कोरोनाविरोधात जिंकण्याचा इतिहास आपण रचू, असा विश्वास मला आहे, असेही पवार यांनी म्हटले आहे.