स्वातंत्र्यलढ्यातील वीरांगना हौसाताई पाटील यांचे निधन
![Veteran freedom fighter Hausatai Patil passed away](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/09/hausatai.jpg)
सांगली |
स्वातंत्र्य लढ्यावेळी ब्रिटिश साम्राज्याला आव्हान देणाऱ्या पत्री सरकारच्या साक्षीदार, क्रांती सिंह नाना पाटील यांच्या कन्या क्रांती वीरांगना हौसाताई पाटील (वय ९६) यांचे गुरुवारी निधन झाले. चार दिवसापासून त्यांच्यावर कराडमधील कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत होते. आज उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे.
कडेगाव तालुक्यातील हणमंतवाडिये येथे त्यांचे वास्तव्य होते. शेकापचे माजी आमदार भाई भगवानबाप्पा पाटील यांच्या त्या पत्नी, तर शेकापचे नेते अॅड. सुभाष पाटील आणि प्रा. विलास पाटील यांच्या मातोश्री होत्या. त्यांच्या निधनाने स्वातंत्र्य चळवळीतील जाज्वल्य ऐतिहासिक घटनांच्या साक्षीदार असलेल्या एका क्रांतिकारी महिलेला आपण मुकलो असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.