धक्कादायक! पुणे-सोलापूर महामार्गावरील अपघातात वारकऱ्याचा मृत्यू
![Varkara died in an accident on the Pune-Solapur highway](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/06/ashadhi-wari-2023-780x470.jpg)
पुणे : पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीला श्रीगोंदा येथून पायी वारीत निघालेल्या वारकऱ्याला पुणे सोलापूर महामार्गावर मदनवाडी ग्रामपंचायतच्या हद्दीत सकुंडे वस्ती येथे एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. आज पहाटे पाच वाजताच्या सुमारास झालेल्या या अपघातात वारकऱ्याचा मृत्यू झाला आहे.
लक्ष्मण मार्तंड रोडे (वय ७५ व रा. घुटेवाडी ता.श्रीगोंदा जि.अहमदनगर) असे या वारकऱ्याचे नाव आहे. याबाबत भिगवण पोलिस ठाण्यामध्ये लक्ष्मण रोडे यांचे जावई कल्याण गुलाब घुटे यांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.
हेही वाचा – टायटॉनिकचे अवशेष पाहायला गेलेल्या ५ जणांचा मृत्यू
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की बुधवार (दि.२१) रात्रीपासून श्रीगोंदा तालुक्यातील पायी दिंडी वारी सकुंडे वस्तीजवळ मुक्कामी होती. या दिंडीतील ज्येष्ठ वारकरी लक्ष्मण रोडे हे पुढील पायीवरीला मार्गस्थ होण्यापूर्वी आज गुरुवारी (दि.२२) पहाटे पार्थ विधीसाठी रस्ता ओलांडत होते. त्याचवेळी सोलापुर बाजुकडून पुणे बाजुकडे जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने रोडे यांना जोरदार धडक दिली.
या जोराच्या धडकेत लक्ष्मण रोडे यांच्या डोक्यास तसेच उजव्या पायास गंभीर झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनचालक वाहनासह प्रसार झाला सदर अपघाताचा पुढील तपास भिगवण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक लोकरे हे करत आहेत.