कर्ज घेण्यापूर्वी त्याचे प्रकार समजून घ्या!
![Understand its types before taking out a loan!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/01/Loan.jpg)
कर्ज घेताना आपल्याला त्या कर्जाबद्दल पूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. त्यामुळे आज कर्जाचे प्रकार नेमके कोणते असतात, हे आपण जाणून घेऊया.कर्ज वापरण्याचा उद्देश लक्षात घेऊन ते दोन प्रकारांमध्ये विभागलेले असते. पहिले कर्ज म्हणजे ‘सिक्योर्ड लोन’. या प्रकारात बँक कोणतीही मालमत्ता, प्रॉपर्टी किंवा सिक्युरिटीच्या बदल्यात कर्ज देते. हे कर्ज ग्राहकाच्या परताव्याच्या क्षमतेवरच दिले जाते. जर अशावेळी ग्राहकाने बँकेकडून घेतलेले कर्ज योग्य कालावधीत, मुदतीत फेडले नाही तर ग्राहकाने ज्या वस्तूवर कर्ज घेतलेले आहे ती वस्तू विकण्याचे सर्वस्वी अधिकार बँकेकडे असतात. म्हणूनच अशा प्रकारच्या कर्जाला सिक्योर्ड लोन असे म्हणतात.
तसेच दुसऱ्या प्रकारचे कर्ज ग्राहकाच्या भविष्यातील परतावा क्षमतेवर दिले जाते, म्हणूनच या प्रकारच्या कर्जात जोखीमसुद्धा जास्त असते आणि त्यामुळेच अशा कर्जाला ‘अनसिक्योर्ड लोन’ असे म्हटले जाते. जे अनसिक्योर्ड असल्याने यावरील रक्कम कमी मंजूर होते आणि या रक्कमेवर जास्त व्याजदरदेखील आकारला जातो. खरंतर जी कर्जे महाग असतात त्यांना अनसिक्योर्ड लोन असे म्हटले जाते, कारण हे कर्ज सिक्योर राहण्यासाठी बँकेजवळ काही वस्तू ठेवण्याची गरज नसते. अनसिक्योर्ड लोनमध्ये पर्सनल लोन, कमी कालावधीत मिळवले जाणारे भांडवली लोन ज्यात कॅपिटल लोन, एज्युकेशन लोन यांचा समावेश होतो.
सिक्योर्ड लोनचे प्रकार :
होम लोन – घर खरेदी करताना जे कर्ज मिळते त्याला ‘होम लोन’ असे म्हणतात. मात्र होम लोनव्यतिरिक्तसुद्धा अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कर्ज बँक देत असते. जसे की घर बांधण्यासाठी, जमीन खरेदी करण्यासाठी आपण कर्ज घेऊ शकतो. तसेच घराच्या विस्तारीकरणासाठी व घर डागडुजी करण्यासाठीसुद्धा बँक आपल्याला कर्ज पुरविते.
गोल्ड लोन – गोल्ड लोनसुद्धा एकप्रकारचे सिक्योर्ड लोन आहे आणि सिक्योर्ड असल्याने यावरील व्याजदरसुद्धा कमी असतो.
वेहिकल लोन – वेहिकल लोन म्हणजेच गाडी, मोटरवर दिले जाणारे कर्ज. अशा प्रकारचे कर्ज देताना गाडी खरेदी करतेवेळी बँक किंवा कर्ज देणाऱ्या संस्था गाडीचे पेपर आपल्याजवळ ठेवतात. तसेच गाडीवर इन्शुरन्स सुविधासुद्धा मिळतात. अशावेळी जर एखादी घटना घडली तर त्या घटनेमुळे कर्जावरील रक्कम सुरक्षित राहण्याची शक्यता असते.
लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी – आपल्याजवळ असलेली प्रॉपर्टी गहाण ठेवून कर्ज घेणे हे सिक्योर्ड लोनमध्ये येते. हे कर्ज प्रॉपर्टीचे जे बाजार मूल्य असते त्या मूल्याच्या आधारावर आपल्याला मिळते, जे अर्ज करणाऱ्या व्यक्तीच्या उत्पन्नावरूनसुद्धा ठरवले जाते. बँक उत्पन्नाच्या आधारावर प्रॉपर्टी मूल्याचे 50 टक्के ते 80 टक्क्यांपर्यंत कर्ज मंजूर करते आणि अर्जदाराला ही रक्कम कर्ज म्हणून मिळते.
लोन अगेन्स्ट सिक्योरिटी – फिक्स डिपॉजिट्स, पॉलिसी ज्यांची मॅच्युरिटी व्हॅल्यू असते त्यावर आपण कर्ज घेऊ शकतो, जे सिक्योर्ड लोन म्हणून मानले जाते. म्युचुअल फंड्स आणि स्टॉक्सवर दिले जाणारे कर्जसुद्धा सिक्योर्ड लोनच समजले जाते.