बारावीच्या प्रश्नपत्रिका आगीत नष्ट; संगमनेरजवळ वाहनाला अपघात; दहा दिवसांनी परीक्षा
![बारावीच्या प्रश्नपत्रिका आगीत नष्ट; संगमनेरजवळ वाहनाला अपघात; दहा दिवसांनी परीक्षा](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/02/fire.jpg)
संगमनेर |
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेच्या प्रश्न पत्रिकांची वाहतूक करणाऱ्या वाहनाला आग लागल्यामुळे या वाहनासोबतच संपूर्ण प्रश्नपत्रिकाही जळून खाक झाल्या. दहाच दिवसांवर परीक्षा असल्याने या प्रश्नपत्रिका शिक्षण मंडळाला पुन्हा तातडीने छापाव्या लागणार आहेत. पुणे-नाशिक महामार्गावर संगमनेरजवळ चंदनापुरी घाटात बुधवारी पहाटे ही घटना घडली. या घटनेत जीवितहानी झाली नसली तरी प्रश्नपत्रिका आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने बारावी परीक्षेबाबत नव्या अडचणी निर्माण झाल्या आहेत.
मध्य प्रदेशात छपाई केलेल्या बारावीच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांचे गठ्ठे घेऊन हे वाहन पुण्याकडे येत होते. संगमनेरजवळील चंदनापुरी घाटात या वाहनाला आग लागल्याचे चालक मनीष चौरसिया यांच्या लक्षात आले. त्यांनी वाहन थांबवून आग विझविण्याचा प्रयत्न केला. आग विझवण्यात आली. मात्र तोवर वाहनातील सर्व प्रश्नपत्रिका जळून गेल्या होत्या. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाला या घटनेबाबत कळविण्यात आल्यानंतर मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी, सचिव अशोक भोसले व अनुराधा ओक हेही तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या वाहनासोबत असलेले व्यवस्थापक रामविलास राजपूत यांनी घारगाव पोलिसात घटनेची माहिती दिली.
आगीमध्ये बारावीच्या प्रश्नपत्रिका असलेले ८६७ गठ्ठे जळून गेले असून परीक्षेबाबत गोपनीयता असल्याने अधिक सविस्तर तपशील नोंदविलेला नाही, असे घारगाव पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील पाटील यांनी सांगितले. ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच जळालेल्या प्रश्नपत्रिका बारावीच्या कोणत्या शाखेच्या, विषयाच्या होत्या याबाबत गोपनीयतचे कारण देत माहिती देण्यास नकार देण्यात आला आहे.
- अडचण काय?
बारावीच्या प्रश्नपत्रिका असलेले ८६७ गठ्ठे आगीत नष्ट झाले. येत्या ४ मार्चपासून बारावीची परीक्षा सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर या एवढय़ा मोठय़ा संख्येने प्रश्नपत्रिका जळाल्यामुळे नव्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. आगीमध्ये जळालेल्या साहित्यात बारावीचे गोपनीय साहित्य होते. परीक्षेबाबतच्या गोपनीयतेमुळे अधिक तपशील देता येणार नाही.
– शरद गोसावी, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे.