आदिवासींना त्यांच्या जमिनींचे वनहक्क दावे मंजूर करून सातबारा मिळवून देणार- रामदास आठवले
![आदिवासींना त्यांच्या जमिनींचे वनहक्क दावे मंजूर करून सातबारा मिळवून देणार- रामदास आठवले](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/ramdas-atvle-2.jpg)
मुंबई |
धुळे, नंदुरबार यासह राज्यातील आदिवासीच्या ताब्यातील जमिनीचे वनहक्क दावे मंजूर करून आणि सातबारावर आदिवासींची मालकी हक्काची नोंद करून, सातबारा आदिवासींना मिळवून देणार. असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. तसेच, आदिवासींच्या मुलांच्या कुपोषणासह आरोग्य, शैक्षणिक आणि रोजगार विषयक अनेक प्रश्न सोडविण्यासाठी केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयातर्फे वन विभाग, आदिवासी मंत्रालय, राज्य सरकारचे संबंधित अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेऊ. अशी माहिती देखील रामदास आठवले यांनी दिली.
रिपब्लिकन पक्षाचे उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष संदीप देवरे यांनी पिंपळनेर येथे आदिवासी दलित बहुजन मेळाव्याचे आयोजन केले होते. त्या मेळाव्यास प्रमुख मार्गदर्शन रामदास आठवले यांनी केले. यावेळी खासदार हिना गावित, रिपाइंचे राज्य उपाध्यक्ष रमेश मकासरे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष राजाभाऊ कापसे, राज्य उपाध्यक्ष श्रीकांत भालेराव, पंकज साळुंखे आदी उपस्थित होते.
याचबरोबर, राज्यात सध्या झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना राज्यसरकारने तत्काळ नुकसानभरपाई द्यावी, या मागणीचे पत्र आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवणार आहोत, असेही रामदास आठवले यांनी यावेळी सांगितले. महिलांना विधानसभा आणि लोकसभेत ३३ टक्के आरक्षण देण्याची गरज आहे. त्यात दलित आणि आदिवासी महिलांना आरक्षण अंतर्भूत करण्याची गरज आहे. त्याबाबतचा कायदा भविष्य काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी करतील असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला.