परिवहन मंत्री अनिल परब यांचा रिसॉर्ट तात्काळ पाडा : किरीट सोमय्या
– अनिल परब यांच्या दापोली रिसॉर्टचा बिनशेती परवाना रद्द
– रत्नागिरी अपर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
मुंबई | प्रतिनिधी
ठाकरे सरकार मधील परिवहन मंत्री अनिल परब यांच्या दापोली येथील साई रिसॉर्टचे बांधकाम बेकायदेशीर आहे. सदर रिसॉर्टचा बिनशेती परवाना फसवणुकीने घेण्यात आला होता. तो परवाना रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे अनिल परब यांचा रिसॉर्ट तात्काळ पाडावे असे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.
मुरुड तालुका दापोली येथील गट क्रमांक 446 येथील साई रिसॉर्ट एनेक्सचे बांधकाम बेकायदेशीर आहे. त्यात सीआरझेड कायद्याचे उल्लंघन केले असल्याचे सोमय्या यांनी सुरुवातीला म्हटले होते. फसवणूक, दस्तावेजात खाडाखोड, करत परब यांनी पदाचा दुरुपयोग केला, असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. सोमय्या यांनी केलेल्या तक्रारीनंतर साई रिसॅार्टच्या अनधिकृत बांधकामाबाबत वस्तुस्थिती काय आहे. याची खातरजमा करण्याचे आदेश रत्नागिरीच्या अप्पर जिल्हाधिका-यांनी दिले होते. साई रिसॉर्ट एनडीझेड (नो-डेव्हलपमेंट झोन) मध्ये असल्याचे प्राथमिक निरीक्षण नोंदवण्यात आले होते.
याप्रकरणी उपविभागीय अधिकारी दापोली यांच्याकडून निर्गमित करण्यात आलेल्या बिनशेती आदेशाबाबत महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 257 नुसार पुनरीक्षणाची सुनावणी झाली. त्यावर निर्णय देत रत्नागिरीचे अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिलेला बिनशेतीचा आदेश रद्द केला आहे.
याबाबत किरीट सोमय्या यांनी ट्विट केले असून त्यात त्यांनी म्हटले आहे की, ‘ठाकरे सरकारचे मंत्री अनिल परब यांचा दापोली रिसॉर्ट बेकायदेशीर आहे. त्याचा बिनशेती परवाना फसवणुकीने, फॉर्जरी करून घेण्यात आला होता. तो आत्ता रद्द करण्यात आला आहे आहे असे अॅफिडेविट महाराष्ट्र शासनाने मंगळवारी (दि. 7) लोकायुक्त यांच्याकडील सुनावणीत दाखल केले असल्याचे सोमय्या यांनी म्हटले आहे.