आज तुमचे दिवस…उद्या आमचे येतील; जामीन मिळाल्यावर संदीप देशपांडेंचा सरकारला इशारा
मुंबई : सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केल्यानंतर मनसे नेते संदीप देशपांडे हे अखेर १६ दिवसांनंतर माध्यमांसमोर आले आहेत. यावेळी संदीप देशपांडे यांनी आपली बाजू मांडताना राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. ‘आम्ही सरकारविरोधात बोलू नये, आमचं तोंड बंद राहावं, यासाठी सरकारने हा प्रयत्न केला. आज तुमचे दिवस आहेत, उद्या आमचे येतील,’ असा इशारा देशपांडे यांनी दिला आहे.
‘प्रसारमाध्यमांचं जे फुटेज होतं ते स्वयंस्पष्ट होतं, आमच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि या गुन्ह्यासाठी अख्ख्या महाराष्ट्राचे पोलीस आम्हाला शोधत होते. तुमच्या फुटेजचे स्क्रीनशॉट माझ्या वकिलांनी कोर्टात दाखवले आणि सरकारने दबाव निर्माण करण्यासाठी आमच्यावर गुन्हे दाखल केल्याचं सांगितलं. आमचा कायद्यावर पूर्ण विश्वास होता आणि त्याप्रमाणे आम्हाला न्याय मिळाला,’ असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.