लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी दुरुस्तीची आज अंतिम मुदत

Ladki Bahin Yojana | राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी (eKYC) दुरुस्ती करण्याची अंतिम मुदत आज, मंगळवार (३१ मार्च) रोजी संपत आहे. प्रशासनाकडून ही शेवटची संधी असल्याचे स्पष्ट करण्यात आले असून यानंतर कोणतीही नवीन मुदत देण्यात येणार नाही. या योजनेच्या सुरुवातीला सुमारे २ कोटी ४७ लाख महिला लाभार्थी होत्या. मात्र ई-केवायसी प्रक्रियेनंतर पात्र लाभार्थ्यांची संख्या कमी होऊन सध्या १ कोटी ७६ लाख ५८७६ इतकी झाली आहे. त्यामुळे जवळपास ७१ लाख महिला या योजनेतून बाद होण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने सुरू केलेल्या या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यावर दरमहा १५०० रुपये आर्थिक मदत जमा केली जाते. ही योजना राज्यभर लोकप्रिय ठरली होती. मात्र तपासणीदरम्यान काही अपात्र व बोगस लाभार्थी योजनेत सामील झाल्याचे निदर्शनास आले. वार्षिक उत्पन्नाची मर्यादा अडीच लाख रुपये असतानाही काही सधन महिला तसेच सरकारी कर्मचारी महिलांनी लाभ घेतल्याचे स्पष्ट झाले.
हेही वाचा : अभय योजनेचा ५५ हजार ७३१ थकबाकीदारांनी घेतला लाभ
ई-केवायसी प्रक्रियेदरम्यान काही लाभार्थ्यांनी कुटुंबातील सदस्य सरकारी सेवेत आहे की नाही यासंदर्भात चुकीची माहिती भरल्यामुळे त्यांचे हप्ते बंद झाले होते. संबंधित तक्रारी लक्षात घेऊन दुरुस्ती करण्यासाठी शासनाने पुन्हा एकदा ३१ मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली होती.
महिला व बालविकास विभागाच्या नोंदीनुसार सध्या १ कोटी ७६ लाखांहून अधिक महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या असून लाभार्थ्यांची संख्या कमी झाल्यामुळे शासनाच्या आर्थिक भारातही काही प्रमाणात बचत होणार आहे.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा





