नाशिकमध्ये तीन दिग्गजांचा कोरोनाने मृत्यू
नाशिक– एकीकडे कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढतेय, तर दुसरीकडे कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्येही वाढ होत आहे. नाशिक जिल्ह्यातही कोरोनाने कहर माजवला आहे. नाशिकमध्ये दिवसभरात तीन दिग्गजांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. यामुळे जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मालेगावमधील शिवसेना नगरसेविका कविता किशोर बच्छाव यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. सुरुवातीला सौम्य लक्षणे असल्याने त्या होम क्वारंटाईन होत्या. त्याच ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र काल रात्री उशिरा अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच शिवसेना नगरसेविका कविता बच्छाव यांची प्राणज्योत मालवली होती. तर दुसरीकडे नाशिकमधील ज्येष्ठ कवी उपेंद्र पाराशेरे आणि क्रीडा शिक्षक प्रशांत भाबड यांचे कोरोनाने निधन झाले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर नाशिकच्या सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.