कोरोनाबाधिताला भेटायला गेल्याने एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू
![# Covid-19: Delta, first discovered in India and rapidly transmitted, spreads in Britain](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/corona-1.jpg)
सांगली – कोरोना झाल्याची माहिती लपवलेल्या नातेवाईकांना भेटल्याने एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील टाकळी येथे घडली. या घटनेमुळे एकीकडे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असताना कोरोनाची माहिती लपवण्याबद्दल संतापही व्यक्त होत आहे. मृत्यू झालेल्या एकाच कुटुंबातील बाहुबली पाटील, त्यांच्या पत्नी आणि काका अशा तिघांचा मृत्यू झाला.
मिरज तालुक्यातील टाकळी येथील रहिवासी असलेले बाहुबली पाटील यांच्या एका नातेवाईकाची तब्येत बिघडली होती. या नातेवाईकाला कोरोनाची लागण झाली होती. ही माहिती मिळताच बाहुबली पाटील यांच्या आई आजारी नातेवाईकाला पाहण्यासाठी त्यांच्या घरी गेल्या. नातेवाईकाला कोरोनाची लागण झाल्याची माहिती बाहुबली पाटील यांच्या आईपासून लपवून ठेवण्यात आली. नातेवाईकाला पाहून घरी परतलेल्या बाहुबली यांच्या आईला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.
बाहुबली पाटील यांच्या आईला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांचा संसर्ग बाहुबली पाटील यांच्या पत्नी, त्यांचे दोन चुलते आणि चुलतभावांना झाला. या संपूर्ण कुटुंबालाच कोरोनाची लागण झाली. सुरुवातीला या सर्वांना कोरोनाची सौम्य लक्षणे दिसत होती. म्हणूनच या संपूर्ण कुटुंबाने घरीच उपचार सुरू ठेवले. मात्र काही दिवसातच बाहुबली पाटील यांची तब्येत खालावत गेली. त्यानंतर पाटील कुटुंबातील सर्वच बाधितांना कोल्हापुरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
प्रथम पाटील कुटुंबातील बाहुबली पाटील यांच्या आईची प्रकृती खूपच खालावली आणि त्यात त्यांचा मृत्यू ओढवला. त्यानंतर काही दिवसांनी बाहुबली यांच्या चुलत्याचे निधन झाले. पाटील कुटुंबाला दोन धक्के बसल्यानंतर बाहुबली पाटील यांचेही कोरोनाने निधन झाले. पाटील कुटुंबातील तिघांचा मृत्यू ओढवल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून भितीचे वातावरणही पसरले आहे.