सोसायटी पदाधिकाऱ्यांना धमक्या; विधान परिषदेत विरोधक आक्रमक, “तर दोन्ही मीटर लावू आणि ६ महिने…” वाढत्या वीज बिलाच्या तक्रारींवर सरकारचा नवा तोडगा

मुंबई : स्मार्ट मीटरची सक्ती केली जाणार नाही, हे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन धाब्यावर बसवून राज्यभर वीज ग्राहकांना वेठीस धरले जात असल्याचा आरोप करत मंगळवारी विरोधक विधान परिषदेत चांगलेच आक्रमक झाले. त्यावर स्मार्ट मीटरबाबत ग्राहकांच्या तक्रारी असल्यास त्यांची दखल घेऊन सोडवणूक करू, असे आश्वासन ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डिकर यांनी दिले.
मुंबईत स्मार्ट मीटर लावण्याकरिता आलेल्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांबरोबर बाऊन्सर्स असतात. ग्राहक घरी नसताना त्यांचे मीटर बदलले जाते. कोकणातील गावातही हा प्रकार होत आहे. त्याबद्दल पोलिसांकडे तक्रारी दाखल केल्या गेल्या आहेत, असा पाढा वाचत शिवसेनेचे (ठाकरे गट) सुनील शिंदे यांनी स्मार्ट मीटर बसविण्याच्या निविदेला स्थगिती देण्याची आणि सक्ती करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. तसेच, केंद्रीय विद्युत प्राधिकरणाकडे यावर पुनर्विचार करण्याकरिता राज्य सरकार मध्यस्थी करणार का, अशी विचारणा केली.
हेही वाचा – ‘२२ जुलै ते २२ ऑगस्टदरम्यान राज्यभर ‘कृषी महोत्सव’चे आयोजन’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
केंद्रीय विद्युत प्राधिकरणाने वितरण कंपनीने स्मार्ट मीटर बसविणे बंधनकारक केले आहे. त्यानुसार राज्यातील २ कोटी ४० लाख ग्राहकांपैकी एक कोटी २३ लाख ग्राहकांच्या घरी स्मार्ट मीटर लावले गेले आहेत, असे उत्तर ऊर्जा विभागाच्या राज्यमंत्री मेघना बोर्डिकर यांनी सांगितले.
मात्र मागील अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्मार्ट मीटरची सक्ती केली जाणार नाही, असे आश्वासन दिले होते आणि तुम्ही बंधनकारक असल्याचे सांगता. आम्ही कुणावर विश्वास ठेवायचा असा प्रश्न करत आक्रमक झालेल्या आमदार अनिल परब यांनी अदानीकरिता ग्राहकांवर दबाव आणला जात असल्याचा आरोप केला. त्यावर, मुख्यमंत्री ‘प्रीपेड’ सक्तीने बसविले जाणार नाही, असे म्हटल्याचा खुलासा बोर्डिकर यांनी केला.
…तर दोन्ही मीटर ठेवू
कोणतीही पूर्वसूचना न देता बळजबरीने राज्यभर ग्राहकांचे जुने मीटर बदलून स्मार्ट मीटर लावले जात आहे. मीटर बदलास सहकार्य न केल्यास कारवाईची धमकी ग्राहकांना आणि सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या जात असल्याचा आरोप करत या मीटरमुळे अधिक बिल येत असल्याची ग्राहकांची तक्रार असल्याचे परब म्हणाले. त्यावर ज्या ग्राहकांच्या स्मार्ट मीटरमुळे अधिक देयक येते अशी तक्रार आहे, त्यांची दोन्ही मीटर ठेवू आणि सहा महिने तपासणी करू, असे बोर्डिकर यांनी सुचविले.





