Pune | ससूनमधील डॉक्टरला पैसे पोहोचविणारे अटकेत
![Those delivering money to doctors in Sassoon arrested](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/06/Sassoon-Hospital-Pune-780x470.jpg)
पुणे | कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीन आरोपीच्या रक्तनमुन्यात बदल केल्याप्रकरणी गुन्हे शाखेने मंगळवारी दोघांना अटक केली. बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवालने आरोपींच्या मार्फत ससूनमधील डॉक्टरला या दोघांनी पैसे पोहोचविल्याचे समोर आले आहे. अश्फाक बाशा इनामदार (वय ३६, रा. धानोरी, विश्रांतवाडी), अमर संतोष गायकवाड (वय २७, रा. सुभाषनगर, नवी खडकी, येरवडा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
अल्पवयीन मुलाच्या रक्तनमुन्यातील बदल केल्याप्रकरणी यापूर्वी ससून रुग्णालयातील न्यायवैद्यक शास्त्र विभागातील डॉ. अजय तावरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर, शिपाई अतुल घटकांबळे यांना अटक केली होती. मुलाच्या रक्तनमुन्यात बदल करण्यासाठी अगरवालने डॉ. तावरे यांना पैसे दिले होते.
हेही वाचा – ‘विधानसभा निवडणुकीत मविआ १८० ते १८५ जागा जिंकणार’; संजय राऊतांचा मोठा दावा
अगरवालने डॉ. तावरे यांना कोणामार्फत पैसे दिले, याचा तपास गुन्हे शाखेकडून सुरू होता. तपासात अगरवालने अश्फाक आणि अमर यांच्याशी संपर्क साधून डॉ. तावरे यांना पैसे दिल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पसार झालेल्या अश्फाक आणि अमर यांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. पोलिसांनी दोघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना १० जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे.
कल्याणीनगर भागात १९ मे रोजी अपघात घडला होता. भरधाव मोटारीच्या धडकेत संगणक अभियंता तरुण-तरुणीचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी विशाल अगरवालच्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले होते. मुलाने मद्यप्राशन केल्याची माहिती चौकशीत मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याला ससून रुग्णालयात आणले. ससूनमधील डॉ. तावरे यांच्याशी अगरवालने संपर्क साधला. मुलाच्या रक्तनमुन्यात बदल करण्यासाठी त्याने डॉ. तावरे यांना पैसे दिले होते. मुलाला वाचविण्यासाठी त्याची आई शिवानी अगरवालने रक्त दिल्याचे तपासात उघड झाले. त्यानंतर याप्रकरणी शिवानी अगरवालसह पती विशालला अटक करण्यात आली.