‘कायदा सुव्यवस्थेची दुर्दशा दाखविणारी ही आणखी एक घटना’; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर सुप्रिया सुळेंची पोस्ट
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/10/Ratan-Tata-1-2-780x470.jpg)
Baba Siddique : अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांची काल रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास वांद्रे येथील खेरवाडी जंक्शनजवळ घडलेल्या या घटनेने देशभरात खळबळ उडाली आहे. या हत्या प्रकरणातील दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर तिसऱ्या आरोपीचा शोध घेतला जात आहे. यासंदर्भात पुढील तपास गुन्हे अन्वेषण विभाग करत असल्याची माहितीही पोलिसांकडून सांगण्यात आली आहे. दरम्यान याप्रकरणावर खासदार सुप्रिया सुळे यांनी एक पोस्ट शेअर केली आहे.
“अतिशय धक्कादायक! मुंबईतील माजी आमदार व मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची बातमी अतिशय दुःखद आणि दुर्दैवी आहे. त्यांच्यासारख्या बुजुर्ग नेत्याला भररस्त्यात गोळी झाडून मारण्यात आले. पुणे असो किंवा मुंबई राज्यातील कायदा सुव्यवस्थेची दुर्दशा दाखविणारी ही आणखी एक घटना. बाबा सिद्दिकी यांना भावपूर्ण श्रद्धांजली. या कठिण प्रसंगी माझ्या संवेदना त्यांचे पुत्र झीशान यांच्यासोबत आहेत. त्यांच्यावर गोळीबार करणाऱ्या गुन्हेगारांवर कठोरात कठोर कारवाई करावी,” अशी पोस्ट सुप्रिया सुळेंनी केली.
हेही वाचा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळावा भाषणातील मुद्दे
मिळालेल्या माहितीनुसार, बाबा सिद्धिकी यांच्यावर गोळीबार करण्यासाठी तीनही आरोपी हे रिक्षाने घटनास्थळी आले होते. तसेच तीनही आरोपी बाबा सिद्धिकी बाहेर येण्याची वाट पाहात होते. बाबा सिद्दीकी कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर फटाके फोडत असताना त्यांच्यावर गोळी झाडण्यात आली.
फटाके फोडत असताना अचानक कारमधून तीन जण खाली उतरले. ओळख पटू नये म्हणून हे तिघेही तोंडाला रुमाल बांधून आले होते. बाबा सिद्दीकी यांच्यावर तीन राऊंड गोळीबार केला. छातीत गोळी लागल्याने बाबा सिद्दीकी खाली पडला. यानंतर लोकांनी त्यांना तात्काळ लीलावती रुग्णालयात दाखल केले, तेथे त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसरात तपास सुरू केला आणि काही वेळातच दोन आरोपींना ताब्यात घेतले.