भुरट्या चोरट्यांनी फायनान्स कंपनीतील चक्क तिजोरीच पळवली, नऊ लाख केले लंपास
![फायनान्स कंपनीतील चक्क तिजोरीच पळवली, भुरट्या चोरट्यांनी नऊ लाख केले लंपास](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/04/फायनान्स-कंपनीतील-चक्क-तिजोरीच-पळवली-भुरट्या-चोरट्यांनी-नऊ-लाख-केले.jpg)
हिंगोली |
कळमनुरी शहरातील विकास नगर भागात असलेल्या एका फायनान्स कंपनीच्या कार्यालयाचे कुलूप तोडून चोरट्यांनी साडे नऊ लाख रुपये असलेली तिजोरी पळविल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. कळमनुरी पोलिस आणि सोबतच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी येथील विकास नगरांमध्ये स्पंदना फायनान्स कंपनीचे कार्यालय आहे. बचत गट व इतरांना दिलेल्या कर्जाच्या हप्त्याची दररोज वसुली करून कंपनीच्या कार्यालयात असलेल्या तिजोरीमध्ये ठेवली जाते.
- असा उघडकीस आला सर्व प्रकार
दरम्यान, नेहमीप्रमाणे कर्ज हप्त्याची वसूल केलेली सुमारे साडेनऊ लाख रुपये रक्कम या तिजोरीत ठेवण्यात आली होती. रविवारी कार्यालयाला कुलूप होते. तर या कार्यालयाच्या मजल्यावर राहणारे कंपनीची कर्मचारी रात्री उकाड्यामुळे छतावर झोपण्यासाठी गेले होते. त्याच रात्री चोरट्यांनी कार्यालयाचे कुलूप तोडून सुमारे साडेनऊ लाख रुपये असलेली तिजोरी पळवली. जाताना चोरट्यांनी दरवाजाचे कुलूपही सोबत नेले. दुसऱ्या दिवशी सकाळी कार्यालयाचा दरवाजा उघडा असल्याचं काही कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी कार्यालयात जाऊन पाहिले. तर तिथे कार्यालयातील तिजोरी गायब असल्याचे आढळून आले.
या घटनेची माहिती तातडीने कळमनुरी पोलिसांना देण्यात आली. पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कळमनुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील निकाळजे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक उदय खंडेराय उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, जमादार बालाजी बोके, संभाजी लकुळे, भगवान आडे, किशोर सावंत यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तातडीने श्वानपथकाला पाचारण केले. मात्र, श्वान पथकाला चोरट्याचा माग काढता आला नाही. तसेच घटनास्थळावर आता तसे तज्ज्ञांकडून पाहणी केली जात आहे. तर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कार्यालयाच्या वर राहणाऱ्या कर्मचार्यांकडे चौकशी सुरू केली आहे. याप्रकरणी अद्याप पर्यंत गुन्हा दाखल झाला नाही.