…तर जिल्हा सहकारी बँक एकहाती शिवसेनेच्या हातात येईल; खासदार प्रतापराव जाधव यांचे सूचक विधान
![...तर जिल्हा सहकारी बँक एकहाती शिवसेनेच्या हातात येईल; खासदार प्रतापराव जाधव यांचे सूचक विधान](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/05/तर-जिल्हा-सहकारी-बँक-एकहाती-शिवसेनेच्या-हातात-येईल-खासदार-प्रतापराव.jpg)
दापोली : कोकणात शिवसेनेने (Shiv Sena) सहकार क्षेत्रातील निवडणुकीत लक्ष घालणे आवश्यक असून गाव विकास सोसायटया ताब्यात घेत सहकार व राजकारण यांची योग्य प्रकारे सांगड घातल्यास रत्नागिरी जिल्हा सहकारी बँकसुध्दा एकहाती शिवसेनेच्या ताब्यात येणे कठिण नाही, असे सूचक विधान शिवसेनेचे बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी दिला. दापोली विधानसभा मतदारसंघातील शिवसंपर्क अभियानाच्या दापोली तालुका मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.
ग्रामविकास सोसायटयांच्या निवडणुका कधी होतात ते कळत सुध्दा नाही. त्यावर लक्षात ठेवा. सहाय्यक निबंधक यांच्या संपर्कात रहा. याकडे आपल्या कार्यकर्त्यांनी लक्ष दिल्यास पदांची कमी नाही. या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात, असेही त्यांनी यावेळी नमूद केले. स्थानिक पातळीवर तुमची ताकद वाढवून सगळ्या निवडणुका स्वबळावर लढा व जिंका. यासाठी प्रत्येक वेळेला वरिष्ठ पातळीवरून निरोपाची आवश्यकता नाही, असेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
या मतदारसंघाचे आमदार योगेश कदम हे युवा नेतृत्व आहे. ते उत्तम काम करतायत. त्यांनी विकासकामाचा वेग चांगला ठेवला आहे, अशा शब्दात आमदार योगेश कदम यांचे जाधव यांनी कौतुक केले. युवासेनेच्या कामाकडे लक्ष देत युवा संघटन मजुबत करून त्यांना आवश्यक ते मार्गदर्शन करा, अशी सूचना जाधव यांनी यावेळी दिली. मी पण विदर्भात काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात बाळासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. सगळी पदे, टप्पे पार करत आज खासदार झालो. हे फक्त शिवसेनेतच होऊ शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ज्याच्या खांदयावर शिवसेनेचा भगवा असेल त्याचा आदेश महत्वाचा. नेत्यांच्या वादात पडू नका. शिवसेनेत शिवसैनिक हे पद महत्वाचे आहे, असे रत्नागिरी सिंधुदुर्ग समन्वयक शरद बोरकर यांनी म्हटले आहे. यावेळी सहकार क्षेत्रातील शिवसेनाप्रणित संघटनेवर महत्वाच्या पदावर निवड झाल्याबद्दल सुधीर कालेकर, मधुकर दळवी तसेच तीनही नुतन नगरसेविका यांचा गौरव खासदार प्रतापराव जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमात जिल्हाप्रमुख सचिन कदम, उपजिल्हाप्रमुख सुधीर कालेकर, संपर्कप्रमुख सुधीर मोरे, शरद बोरकर, उन्मेश राजे, प्रदीप सुर्वे, निलेश शेठ, चारुता कामतेकर, स्नेहल महाडिक नगरसेविका शिवानी खानविलकर, कृपा घाग, सौ. शिर्के आदि शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.