सेना राष्ट्रवादीची वेळ संपली, आज काँग्रेसची पाळी, ‘कोण होतास तू, काय झालास तू?’ म्हणत राज ठाकरेंची खिल्ली
![सेना राष्ट्रवादीची वेळ संपली, आज काँग्रेसची पाळी, 'कोण होतास तू, काय झालास तू?' म्हणत राज ठाकरेंची खिल्ली](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/04/raj-thakrey-balasaheb.jpg)
मुंबई |
“मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते आहेत. मधल्या काळात त्यांची भाषण लोकप्रिय झाली ती ‘लाव रे तो व्हिडीओ’ या त्यांच्या फॉर्म्युल्यानंतर.. पण दोनच वर्षांत त्यांनी एवढा युटर्न घेतलाय की, आता त्यांची अवस्था पाहून, कोण होतास तू, काय झालास तू? असं म्हणावं लागेल”, अशा शब्दात काँग्रेस नेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी राज ठाकरे यांच्या भाषणाची खिल्ली उडवली.
मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या शिवतीर्थावरील पाडव्या मेळाव्यातील भाषणाची महाराष्ट्रात जोरदार चर्चा आहे. राज ठाकरेंच्या भाषणाचं भाजपकडून स्वागत केलं गेलं आहे तर महाविकास आघाडीतील नेत्यांनी मात्र राज ठाकरे यांच्या नव्या भूमिकेवर सडकून प्रहार केलाय. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना राज ठाकरेंच्या भाषणावर पत्रकारांनी प्रश्न विचारले असता त्यांनी राज ठाकरेंवर मिश्किल टिप्पणी करत राजकीय टोलेबाजी केली.
“लोकसभा निवडणूक २०१९ च्या काळात राज ठाकरेंच्या भाषणामुळे सामान्य जनांमध्ये त्यांच्याविषयी एक आकर्षण निर्माण झालं होतं. त्यांच्या लाव रे तो व्हिडीओची सगळीकडे चर्चा होती. सत्य सांगण्याचा ते प्रयत्न करत होते. पण २ वर्षांत त्यांनी एवढा मोठा युटर्न घेतलाय, की त्यांचं सर्वांनाच आश्चर्य वाटतंय”, असं बाळासाहेब थोरात म्हणाले. मनसे ही भाजपची सी टीम आहे, या शिवसेनेच्या आरोपावर बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले, “लगेच कमेंट करणं घाईचं होईल. पण येणाऱ्या काळातील त्यांच्या भूमिकांवरुन आणि ते कशी पावलं टाकतात, त्याच्यावरुन त्यांची टीम ठरेल.”
मशिदीववरचे अनधिकृत भोंगे हटवले पाहिजेत, या राज ठाकरेंच्या मतावर काँग्रेसचं काय म्हणणं आहे, असाही प्रश्न थोरातांना विचारण्यात आला. या प्रश्नावर थेट उत्तर देणं थोरातांनी टाळलं. “देश अशा प्रश्नांनी पुढे जाणार नाही. देश पुढे जायचा असेल तर विधायक कार्य गरजेचं आहे. मग अलीकडच्या काळामध्ये मतांची पोळी भाजून घेण्यासाठी असे मुद्दे उचलून धार्मिक धुर्वीकरण करण्याचा प्रयत्न होतोय”, असं थोरात म्हणाले.