राज्य सरकारने आधी भूमिका स्पष्ट करावी, मग आंदोलनाचं नेतृत्व कोणी करायचं ते ठरवू- उदयनराजे भोसले
![The state government should first clarify its role, then decide who will lead the movement - Udayan Raje Bhosale](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/Udyanraje-Bhosale-1-300x200-1.jpg)
सातारा – खासदार संभाजी छत्रपती, शिवेंद्रसिंहराजे आणि मी कुटुंब म्हणून एकत्र आहोत. संभाजीराजेंच्या भूमिकेशी विसंगती असण्याचं कारण नाही, असं सांगतानाच आधी राज्य सरकारने आरक्षण विषयक भूमिका स्पष्ट करावी, मग आरक्षण आंदोलनाचं नेतृत्व कुणी करायचं ते ठरवू, असं भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी स्पष्ट केलं.
उदयनराजे भोसले यांच्या साताऱ्यातील जलमंदिर पॅलेस येथे शिवराज्याभिषेक दिनाचा सोहळा पार पडला. त्यानंतर त्यांनी आपली भूमिका व्यक्त केली. यावेळी त्यांनी संभाजी छत्रपती यांच्या आंदोलनाला अप्रत्यक्षपणे पाठिंबाच दिला. संभाजीराजेंनी जी भूमिका घेतलीये, त्या भूमिकेशी विसंगती असण्याचं कारण नाही. आम्ही तिन्ही राजे कुटुंब म्हणून एकत्र आहोत. आधी सरकारने आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट करावी. सरकारला तेच सांगून कंटाळा आला आहे. किळस आली आहे. सरकारने या विषयावर श्वेतपत्रिका जाहीर करावी. अधिवेशन बोलवा, लाईव्ह टेलिकास्ट करा. सरकारची भूमिका स्पष्ट झाल्यावरच आम्ही नेतृत्व करणार ना?, असं उदयनराजे म्हणाले.
मराठा असो की कोणीही असो आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना आरक्षण लागू करा. त्याचा वेगळा अर्थ लावू नका. आरक्षण फक्त मागासवर्गीय समाजाला लागू होतं हे चुकीचं, असं ते म्हणाले. जर लोकप्रतिनिधी प्रश्न सोडवणार नसतील तर लोक काय करतील? लोक दुसरा मार्ग निवडणारच ना. आज अनेकजण फास लावून घेतायेत, मात्र आता लोक फास लावून घेणार नाहीत. तर राज्यकर्त्याना फास लावतील, आता ती वेळ लांब नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
मराठा आरक्षण हा केंद्राचा विषय नाही. तो राज्याचा विषय आहे. सरकार खोटं बोलून दिशाभूल करत आहे, असं सांगतानाच मराठा आरक्षणावर अधिवेशन बोलावण्याची मागणीही त्यांनी केली. तसेच मराठा समाज हा महाराष्ट्रात मोठा समाज आहे. राजस्थानात मारवाडी बहुसंख्य आहेत. या समाजातील खासदार, आमदारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीचं आरक्षण लागू होत नाही. मात्र सरकारने गरिबांना तरी आरक्षण द्यावं, अशी मागणीही त्यांनी केली.