मांजरेकरांचा ‘वरान भात’ चित्रपटाचा शो स्त्री शक्तीच्या चौघींनी बंद पाडला
लातूर | प्रतिनिधी
अभिनेते आणि दिग्दर्शक महेश यांचा “नाय वरण-भात लोन्चा, कोन नाही कोन्चा ‘ हा वादात सापडलेला चित्रपट काल भारतीय स्त्री शक्ती आणि आयएमएच्या चारच महिला कार्यकर्त्यांनी बंद पाडला. या चित्रपटाविरोधात भारतीय स्त्री शक्ती संघटनेने मुंबई, नागपूर, लातूर आणि पुणे येथील पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या आहेत.
लातुरातील पीव्हीआर आणि यशोदा या दोन चित्रपटगृहात काल प्रदर्शित होणारा महेश मांजरेकर यांचा हा चित्रपट कोरोना नियमांचे पालन करत स्त्री शक्तीच्या केवळ चारच महिलांनी आंदोलन करत बंद पाडला. कोरोनामुळे जमावबंदीचे आदेश असल्याने या चारच महिलांनी आदेश न मोडता हे आंदोलन करून दाखवले. भारतीय स्त्री शक्ती या संघटनेने म्हटले आहे की, मांजरेकर यांनी हा चित्रपट प्रौढांसाठी असल्याचे म्हटले असले तरी या चित्रपटाच्या जाहिरातीच्या प्रोमोमध्ये तसा कुठेही उल्लेख करण्यात आलेला नाही. या चित्रपटात लहान मुलांचा अत्यंत आक्षेपार्ह पध्दतीने वापर करून हिंसाचार आणि केवळ अश्लिलता यात दाखवली आहे. त्यामुळे पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी स्त्री शक्तीने केली आहे. दरम्यान, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाच्या प्रमुख प्रियंका कांगो यांनी महेश मांजरेकर यांना यासंदर्भात नोटीस पाठवली आहे.