शाश्वत सुखाचा शोध घेण्याची गरज: सद्गुरू शिवकुमार महास्वामीजी
![The need to seek eternal happiness: Sadguru Shivakumar Mahaswamiji](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/01/Shivkumar-Mahaswami-780x386.jpg)
पिंपरी : प्रपंचामुळे माणसाला सुख मिळेल पण शांती नाही. जो शाश्वत सुखासठी प्रयत्न करतो त्यालाच मोक्षप्राप्ती होते असे प्रतिपादन प. पू. सद्गुरू शिवकुमार महास्वामीजी (बिदर) यांनी येथे केले. दि. २८ जानेवारीपासून एक फेब्रुवारी पर्यंत भोसरी येथे प.पू. सद्गुरु शिवकुमार महास्वामीजी यांचा अध्यात्मिक सोहळा गुरुदर्शन व प्रवचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह येथे दररोज सायंकाळी सहा ते आठ या वेळात ही प्रवचने होणार आहेत.
शनिवारी अध्यात्मिक सोहळ्याचे उद्घाटन केंद्रीय रसायने व खते विभागाचे राज्यमंत्री बिदर जिल्ह्याचे खासदार भगवंत खुबा यांच्या हस्ते होणार होते. मात्र कार्य बाहुल्यामुळे ते उपस्थित राहू शकले नाहीत त्यांचा संदेश यावेळी प्रसारित करण्यात आला.
यावेळी श्री गणेशानंदजी महाराज, शिवलिंग ढवळेश्वर, डी .के. सिद्धांत, अण्णासाहेब बिरादार, विलास मडीगिरी, डॉ. विनोद कुमार पाटील, तुकाराम बिराजदार उपस्थित होते. प्रवचनापूर्वी सायंकाळी भक्ती संगीताचा कार्यक्रम सादर करण्यात आला. गणेश स्तवन तसेच हे शंभू बाबा मेरे भोलेनाथ या गीतांनी वातावरण भक्तीमय झाले.
यानंतर “नरजन्म मोक्षाचा वाटा वृथा जात असे कटकटा” या विषयावर प. पू. सद्गुरु शिवकुमार महास्वामीजी यांचे प्रवचन झाले. यावेळी ते म्हणाले की, मनुष्य जन्म घेऊन जो परमात्मा प्राप्तीसाठी प्रयत्न करत नाही तो मूर्ख समजला पाहिजे. मनुष्यजन्म प्राप्त केल्यावर जे काम करण्यासाठी आपण आलो आहे ते न केल्यास जन्म व्यर्थ आहे. त्याचे फळही तसेच वाईट मिळेल पैसा वाया जाईल दुःख होईल शेवटी रामनाम सत्य होईल. आपण सर्वजण जन्माला आल्यानंतर संपत्ती, मुले, घरदार या सुखाची अपेक्षा करतो पण बायको, मुले, घरदार यामुळे सुख मिळाले तरी हे सारे सुख तात्कालीक आहे. शांती महत्त्वाची आहे प्रपंचामुळे माणसाला सुख मिळेल शांती नाही असे ते म्हणाले. प्रत्येकाला परमनंट घर हवे पर्मनंट नोकरी हवी मग टेम्पररी सुखाचा विचार कशाला करायचा, जो शाश्वत सुखासाठी प्रयत्न करतो त्यालाच मोक्ष मिळतो त्यामुळे शाश्वत सुखाचा शोध घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन सद्गुरु शिवकुमार महास्वामीजी यांनी केले.
रविवार (दि. २९) “धर्मो रक्षती रक्षिता” या विषयावर महास्वामीजींचे प्रवचन होणार आहे. कार्यक्रमाचे आयोजन श्री सद्गुरु सिद्धारूढ अध्यात्मिक समिती, पुणेचे परमपूज्य शंकरानंद स्वामीजी संस्थापक तसेच अध्यक्ष अमरनाथ माना, सचिव रमेश गंताले, रमेश कोहल्ली, शिवपुत्र संत पुरे, सूर्यकांत मुरुड, रवींद्र चांगलेरा, अण्णासाहेब बिरादार, चंद्रशेखर गाणगेर, वीरेंद्र काळे, संतोष बिराजदार, भक्ती धनुरे यांनी केले आहे. कार्यक्रमानंतर महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे सर्व भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री सद्गुरु सिद्धारूढ अध्यात्मिक समिती पुणे यांनी केले आहे.