विरोधी पक्षनेते पदाच्या भाजपमधील रस्सीखेचीवर तोडगा काढणार
![The Leader of the Opposition will settle the tug of war in the BJP](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/04/images_1543234655502_chandrakant_patil.jpg)
- प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील शुक्रवारी नगरमध्ये
नगर |
भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील शुक्रवारी (दि. २३) नगरच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात महापालिकेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी भाजपमध्ये निर्माण झालेल्या रस्सीखेचीवर तोडगा काढला जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते. भाजप प्रदेशाध्यक्ष आ. पाटील शुक्रवारी नगरमध्ये येत आहेत. ते दिवसभर नगरमध्ये थांबून भाजपच्या नगर शहर जिल्ह्यसह दक्षिण व उत्तर जिल्ह्यच्या संघटनात्मक कामकाजाचा आढावा तसेच बूथ कमिटीच्या रचनेचा आढावा घेणार आहेत. प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर पाटील प्रथमच नगरच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे जोरदार शक्तिप्रदर्शन करत त्यांचे स्वागत करण्याचा घाट कार्यकर्त्यांकडून घातला जात आहे.
महापालिकेच्या सत्तेतून पायउतार झाल्यानंतर भाजपमध्ये आता विरोधी पक्षनेते पदासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. महापौर पदावर काम केल्यानंतर आता बाबासाहेब वाकळे पुन्हा विरोधी पक्षनेते पदासाठी इच्छुक आहेत. त्यांच्यासह राष्ट्रवादी की भाजप अशा द्विधा मनस्थितीत सापडलेले मनोज कोतकर या दोघांनीही विरोधी पक्षनेते पदावरील दाव्यासाठी नगरसेवकांच्या सह्यंची मोहीम राबवली. या पदासाठी पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे व उपमहापौर पदावरून पायउतार झालेल्या मालन ढोणे असे चौघे इच्छुक आहेत.
शिवसेनेचा महापौर रोहिणी शेंडगे यांनी वाकळे यांना विरोधी पक्षनेते पदावरील नियुक्तीचे पत्र दिले होते. मात्र त्याला भाजपमधून जोरदार हरकत घेतली गेल्यामुळे या नियुक्तीचा वाद प्रलंबित राहिला आहे. या वादावर तोडगा काढण्यासाठी प्रदेशाध्यक्षांनी गेल्या आठवडय़ात खासदार डॉ. सुजय विखे, माजी मंत्री शिवाजी कर्डिले तसेच इतर पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. मात्र ही बैठक ऐनवेळी रद्द झाली. आता त्यावर प्रदेशाध्यक्ष तोडगा काढणार आहेत. विरोधी पक्षनेते पदाच्या नियुक्तीवरील स्थानिक वादाचा मुद्दा पक्षांतर्गत रस्सीखेचीमुळे थेट प्रदेशाध्यक्ष पातळीवर जाऊन पोचला आहे.