पहिला मान मुक्ताईंचा! संत मुक्ताई पालखीचे मुक्ताईनगरहून पंढरपूरकडे प्रस्थान
![The first neck pearls! Departure of Sant Muktai Palkhi from Muktainagar to Pandharpur](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/07/Capturebhy.jpg)
जळगाव – कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता राज्य सरकारने यंदाही पायी वारी करण्यावर निर्बंध लावले आहेत, मात्र मानाच्या दहा पालख्यांना बसने पंढरपूरकडे जाण्याची परवानगी दिलेली आहे. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील संत मुक्ताई संस्थानच्या संत मुक्ताई या मानाच्या पालखीचे आज मुक्ताईनगर येथून पंढरपूरकडे मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने प्रस्थान झाले. मुक्ताईंच्या पादुका शिवशाही बसने पंढरपूरकडे रवाना झाल्या. यावेळी हरिनामाच्या जयघोषाने मुक्ताईनगर दुमदुमले. सर्वात जास्त प्रवास करून जाणारा हा पालखी सोहळा असून मुक्ताईंच्या पादुकांसोबत 2 बसमध्ये 40 वारकरी आहेत. आता दुपारी वाखरीत मुक्ताई आणि ज्ञानेश्वर सोपान यांची बंधू भेट होईल. दरम्यान, संत मुक्ताई पालखीचे राज्याच्या अध्यात्मिक आणि वारकरी संप्रदायात मोठे मानाचे स्थान आहे. त्यामुळे वारीसाठी संत मुक्ताई पालखीचा पहिला मान असतो. राज्यभरातून पंढरपूरकडे जाणाऱ्या विविध पालख्यांपेक्षा जळगाव जिल्ह्यातील ही पालखी सर्वात आधी निघते आणि पंढरपुरात या पालखीचे सर्वात आधी आगमन होत असते.
आज आषाढ शुद्ध दशमीला आषाढी वारी पालखी सोहळ्यातील माऊली आणि संत तुकाराम महाराज यांच्या पादुका विशेष शिवशाही एसटी बसने अनुक्रमे देहू आणि आळंदीवरून पंढरीकडे मार्गस्थ होतील. माऊलींच्या चांदीच्या चल पादुकांसोबत 2 शिवशाही बसने 40 वारकरी असतील. यात मानाच्या दिंडीवाल्यांमध्ये रथापुढील पहिल्या 9 आणि रथामागील पहिल्या 9 दिंडीतील वारकरी, पुजारी, चोपदार आणि मानकऱ्यांचा समावेश असेल. तर जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पादुका देऊळ वाड्यातील भजनी मंडपातून 40 वारकऱ्यांसह 2 शिवशाही बसने मार्गस्थ होतील. त्यानंतर वाखरीमध्ये संतभेट झाल्यावर पंढरीकडे अडीच किलोमीटर पायी वारीने पादुका निवडक वारकऱ्यांच्या सहभागात नेल्या जातील. त्यानंतर मंगळवारी म्हणजे उद्या देवशयनी एकादशी म्हणजेच आषाढी एकादशीच्या पहाटे 2 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा होईल. महापूजेवेळी मुख्यमंत्र्यांसह 50 लोकांनाच परवानगी असेल. मंदिरातील विणेकरी दाम्पत्य केशव कोलते आणि इंदुबाई हे यंदाचे मानाचे वारकरी असून ते विदर्भातल्या वर्धा जिल्ह्यातील आहेत. या दाम्पत्याला मुख्यमंत्र्यांसोबत यंदाच्या महापूजेचा मान मिळणार आहे.