डेल्टा प्लस विषाणूच्या संसर्गामुळे राज्यात पहिला मृत्यू, राजेश टोपे यांची माहिती
![The first death in the state due to Delta Plus virus infection, Rajesh Tope said](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/03/Rajesh-Tope-1.jpg)
रत्नागिरी – कोरोनाच्या डेल्टा प्लस विषाणूमुळे राज्यात चिंता वाढत असतानाच आज राज्यात या विषाणूच्या संसर्गामुळे पहिला मृत्यू झाला आहे. संगमेश्वररमधील ८० वर्षांच्या महिला बाधिताचा मृत्यू झाला असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. शिवाय, या महिलेला इतर आजारही होते. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिलेल्या माहितीला आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दुजोरा दिला.
राज्यात डेल्टा प्लस विषाणूचा जास्त धोका नसल्याचं काहीच दिवसांपूर्वी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. मात्र, तरीही काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. कारण महाराष्ट्रात या विषाणूमुळे २१ रुग्ण बाधित झाले असून ९ रुग्ण एकट्या कोकण पट्ट्यातील होते. डेल्टा व्हेरियंट बाबतीत सध्या 36 जिल्ह्यामधून नमुने घेण्याचे काम सुरू असून केंद्रीय संस्था NCDC ही राज्य सरकारला मदत करत आहे. सध्या तरी राज्यात कुठलेही निर्बंध लागणार नसल्याचे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे.
राज्यातील 7 जिल्ह्यात कोरोनाच्या डेल्टा प्लस प्रकारातील 21 रुग्ण आढळून आले आहेत. आत्तापर्यंत 3 हजार 400 नमुन्यांपैकी 21 केसेसमध्ये डेल्टा प्लस व्हेरिएंट सापडला आहे. हे प्रमाण 0.005 टक्के आहे. त्यामुळे कोरोनाचा डेल्टा प्लस प्रकाराची गंभीर वाढ अद्याप झालेली नाही. हा काळजी करण्यासारखा विषय नसला तरी त्याचे गुणधर्म गंभीर असल्याचं टोपे यांनी सांगितलं.