लाडकी बहीण योजनेचे दोन महिन्यांनी 1500 रुपयांचे तीन हजार : संजय राऊत
राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला उदंड प्रतिसाद
![The Chief Minister, my dear sister, the scheme, the grand, the response, two, months, three thousand, Sanjay Raut,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/09/sanjay--780x470.jpg)
गोंदिया : राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला उदंड प्रतिसाद मिळाला असून दीड कोटींपेक्षा जास्त महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसेही जमा झाले आहेत. मात्र, राज्य सरकारच्या योजनेवरुन सत्ताधारी महिला वर्गाला आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असताना विरोधकांकडून टोलाही लगावला जात आहे. ही योजना म्हणजे निवडणुकांच्या तोंडावर आमिष दाखवण्याचा प्रयत्न असल्याचं विरोधकांनी म्हटलं आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी सांगलीतील सभेत बोलताना काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी लाडकी बहीण योजनेच्या रकमेत वाढ करण्याचे म्हटले होते. आता, शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही राज्य सरकारवर टीका करताना लाडकी बहीण योजनेचे पैसे दुप्पट होणार असल्याचं म्हटलंय.
संजय राऊत सध्या मराठवाडा दौऱ्यावर असून नांदेड जिल्ह्यतील लोहा येथे शिवसेना पदाधिकारी मेळाव्यात बोलताना त्यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. तसेच, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या श्रेयवादावरही भाष्य केलं. तसेच, लाडक्या बहिणींच्या रकमेत दुप्पटीने वाढ करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. पंधराशे रुपयांत लाडक्या बहिणींचे काम होते का, लाडक्या बहिणीचे अनेक प्रश्न आहेत. महागाईचे प्रश्न आहेत, मुलं बेरोजगार आहेत ते प्रश्न कोणी सोडवायचे, पंधराशे दिले म्हणून मत मिळतील या भ्रमात सरकार आहे. पण, लाडक्या बहिणींनी ते पैसे घ्यावेत, कारण ते पैसे आपलेच आहेत. आपल्याच टॅक्सच्या पैशातून ते पैसे दिले जात आहेत. आता, दोन महिन्यानी आमचं सरकार येतंय, तेव्हा या पंधराशेचे तीन हजार होणार आहेत, असेही राऊत यांनी म्हटले. म्हणजे, 2 महिन्यात सरकार आल्यास लाडक्या बहिणींना 3000 रुपये दरमहा देणार असल्याची घोषणाच राऊत यांनी केलीय. दरम्यान, सांगलीती सभेत काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनीही, आमचं सरकार आल्यास लाडकी बहीण योजनेची रक्कम 2000 रुपये करणार असल्याची घोषणा केली होती.
मोदींनी हात लावला की सत्यानाश होतो
सिंधुदुर्गातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यावरुन थेट नरेंद्र मोदींवर टीका केली. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची मान ठेवू शकत नाही, प्रतिष्ठान ठेवू शकत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी माफी मागतात, पण लाज वाटली पाहिजे, महाराजांच्या नावाने मत मागता, राज्य करता. समुद्रात पूजा नाही झाली, पंतप्रधान गेले होते, पण येताना चार बोटी बुडाल्या. जिथे हात लावलं तिथे, त्यांनी हात लावला की सत्यानाश होतो. जेव्हापासून सरकार आलं तेव्हापासून हेच होतं असल्याचं म्हणत सिंधुदुर्गमधील पुतळा कोसळल्यावरुन सरकारवर हल्लाबोल केला.