दोन दिवसापूर्वी बेपत्ता झालेल्या महिला क्रिकेटरचा मृतदेह जंगलात आढळला…
![The body of a woman cricketer who went missing two days ago was found in the forest.](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/01/Women-Cricekter.jpg)
भुवनेश्वर : गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका महिला क्रिकेटरचा मृतदेह जंगलात झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. ओडिशातील महिला क्रिकेटपटू राजश्री स्वाई ही ११ जानेवारीपासून बेपत्ता होती. तिचा मृतदेह शुक्रवारी १३ जानेवारी रोजी कटकजवळ घनदाट जंगलात आढळून आला आहे. याची माहिती पोलिसांनी दिली असून पोलिस उपायुक्त पिनाक मिश्रा यांनी सांगितले की, मृतदेह अथागढ क्षेत्रातील गुरुदिझाटियातील जंगलात एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला.
गुरुदिझाटिया पोलिस ठाण्यात या प्रकरणी अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांना अद्याप मृत्यूचे कारण समजू शकले नाही. दरम्यान, महिला क्रिकेटरच्या कुटुंबियांनी हत्येची शंका व्यक्त केली आहे. तिच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे की, महिला क्रिकेटरच्या शरीरावर जखमेचे व्रण होते आणि डोळ्यांनाही इजा झाली होती.
राजश्रीची गाडी जंगलाजवळ होती तर तिचा मोबाइल बंद होता. पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणी सर्व बाबींचा तपास केला जाईल. तर कुटुंबियांनी म्हटलं की, राजश्रीसह जवळपास २५ महिला क्रिकेटर ओडिशा क्रिकेट असोसिएशनकडून बाजराकाबाटी इथं आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षण शिबिरात गेल्या होत्या. हे शिबिर पुद्दुचेरीत होणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील क्रिकेट स्पर्धेसाठी होतं. ओडिशा राज्य महिला क्रिकेट संघाची घोषणा १० जानेवारी रोजी करण्यात आली होती. मात्र राजश्रीचा अंतिम यादीत समावेश नव्हता. पोलिसांचे म्हणणे आहे की, ती सरावासाठी लिएतांगी इथल्या क्रिकेट मैदानावर गेली होती. तर राजश्रीने तिच्या प्रशिक्षकांना सांगितले होते की ती आपल्या वडिलांना भेटण्यासाठी पुरीला जात आहे.