यंदा कडाक्याच्या थंडीचे आगमन उशिरा होण्याची शक्यता, नेमकं कारण काय..?

नवी दिल्ली : नोव्हेंबर महिना सुरू झाला असला तरी थंडी जाणवलेली नाही. पावसाळा लांबलेला असतानाच यंदा कडाक्याच्या थंडीचे आगमन उशिरा होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) वर्तवली आहे.
यंदा पावसाळा चांगलाच लांबला. अगदी दिवाळी आणि त्यानंतर ऑक्टोबरच्या अखेरीसदेखील देशात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लागली. नोव्हेंबर येऊन ठेपला तरी थंडीचे कोणतेही संकेत नाहीत. यावर्षी देशभरात कडक हिवाळा उशिरा येऊ शकतो. भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी दिल्ली येथे एका ऑनलाइन परिषदेत सांगितले की, नोव्हेंबरमध्ये देशाच्या बहुतेक भागात दिवसाचे तापमान सामान्यपेक्षा कमी राहू शकते, तर रात्री सामान्यपेक्षा जास्त उष्ण राहू शकते.
हवामानशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की ला नीना प्रभावातील विलंब हे याचे मुख्य कारण आहे. तथापि, पश्चिम हिमालयीन प्रदेश, हिमालयाच्या पायथ्याशी, ईशान्य भारतातील अनेक भाग आणि दक्षिण द्वीपकल्पातील काही भागात दिवसाचे तापमान सामान्यपेक्षा जास्त राहू शकते. रात्रीचे किमान तापमानदेखील सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याने म्हटले आहे की मध्य आणि पूर्व विषुववृत्तीय प्रशांत महासागरावर कमकुवत ला नीनाची स्थिती कायम आहे. ही स्थिती डिसेंबर २०२५ ते फेब्रुवारी २०२६ पर्यंत कायम राहू शकते. ला नीना प्रभावाखाली, समुद्राचे पाणी सामान्यपेक्षा थंड असते.
हवामान खात्याच्या मते, नोव्हेंबरमध्ये देशाच्या बहुतेक भागात सामान्यपेक्षा जास्त किंवा सामान्य पाऊस पडू शकतो. तथापि, वायव्य भारताच्या काही भागात आणि दक्षिण द्वीपकल्पात सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
महापात्रा म्हणाले की, ऑक्टोबरमध्ये देशात सरासरी ११२.१ मिलीमीटर पाऊस पडला, जो सामान्यपेक्षा ४९ टक्के जास्त आहे. २००१ नंतर ऑक्टोबरमध्ये झालेला हा दुसरा सर्वाधिक पाऊस आहे. यापूर्वी, आयएमडीने म्हटले होते की, ऑक्टोबर-डिसेंबर या कालावधीत बहुतेक प्रदेशांमध्ये सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याची अपेक्षा आहे.




