राज्यातील राजकीय भूकंपाचे पडसाद पिंपरी-चिंचवडमध्ये; शिवसैनिक-भाजप कार्यकर्ते आमने-सामने
![पिंपरीत शिवसैनिक-भाजप कार्यकर्ते आमने-सामने; पोलिसांच्या हस्तक्षेपाने तणाव निवळला](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/06/पिंपरीत-शिवसैनिक-भाजप-कार्यकर्ते-आमने-सामने-पोलिसांच्या-हस्तक्षेपाने-तणाव-निवळला.jpg)
पिंपरी : राज्यातील राजकीय भूकंपाचे पडसाद पिंपरी-चिंचवडमध्ये देखील उमटले. पिंपरी चौक येथे गुरुवारी (दि.२३) सायंकाळी शिवसेना आणि भाजपचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते एकमेकांसमोर उभे ठाकले. ‘गद्दार आमदारांचे करायचे काय, खाली डोके वर पाय’, ‘शिवसेना अंगार है, बाकी सब भंगार है’, अशी घोषणाबाजी शिवसैनिकांनी केली. देवेंद्र फडणवीस, तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, अशी घोषणा भाजपकडून करण्यात आली. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमने-सामने आले. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने तणाव निवळला.
शिवसेनेचे काही आमदार गुवाहाटी येथे गेल्याने महाराष्ट्र विकास आघाडी सरकार डळमळीत झाल्याचे सध्या चित्र आहे. गुवाहाटी येथे गेलेल्या आमदारांचा निषेध करण्यासाठी शहरातील शिवसैनिकांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात निदर्शने करण्यात आली. आम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहोत, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
दरम्यान, विधान परिषद निवडणुकीत विजयी झालेल्या उमा खापरे यांचे स्वागत करून शहर भाजपाकडून रॅली काढण्यात आली. पिंपरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा स्मारक येथे ही रॅली आली. त्यावेळी भाजप कार्यकर्ते आणि शिवसैनिक एकमेकांच्या समोर उभे ठाकले. तसेच दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. दोन्ही पक्षातील कार्यकर्ते एकमेकांना भिडण्याची शक्यता असल्याचे पाहून पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून कार्यकर्त्यांना शांतता राखण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर भाजपची रॅली मार्गस्थ झाली.