“…म्हणूनच माझ्यावर राष्ट्रवादीमध्ये येण्याची वेळ आली;” एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट, फडणवीसांना नोटीशीवरून लगावला टोला
![“…म्हणूनच माझ्यावर राष्ट्रवादीमध्ये येण्याची वेळ आली;” एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट, फडणवीसांना नोटीशीवरून लगावला टोला](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/06/Eknath-Khadse-Devendra-Fadanvis-1-1.jpg)
मुंबई |
देवेंद्र फडणवीस यांना नोटीस बजावल्यानंतर राजकारण चांगलंच तापलेलं पाहायला मिळतंय. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. अशातच राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस यांना एक नोटीस आली आणि काय त्यांचा तळफळा सुरु झाला, असा टोला एकनाथ खडसे यांनी लगावला आहे. ते जळगावात एका कार्यक्रमात बोलत आहे. “एक नोटीस आली आणि आपली पिळवणूक होत असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत. मी भ्रष्टाचार बाहेर काढला म्हणून माझी पिळवणूक सुरू झाली, असा दावा करत आहेत. तुम्ही नाथाभाऊंची पिळवणूक केली नाही का?, मी मुख्यमंत्रीपदाचा दावेदार होतो हे तुम्हाला माहिती पडताच तुम्ही माझी पिळवणूक सुरू केली,” असा आरोप एकनाथ खडसे यांनी फडणवीसांवर केला.
“माझ्यामागे जमीन भूखंड प्रकरण, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या बायको बरोबर माझे संबंध जोडले. अंजली दमानिया यांना माझ्यावर आरोप करायला लावलं, हे उद्योग कोणी केले?, असा सवाल एकनाथ खडसेंनी केला. तसेच देवेंद्र फडणवीसांच्या कालखंडात माझे फोन टॅब झाले, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला. शिवाय फोन कोणाचे टॅप होतात ज्यांचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत, त्यांचेच फोन टॅप होतात. माझे काय देशद्रोहीसोबत संबंध आहे का?,” असा थेट सवाल एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीसांना केला. “तुम्ही आजपर्यंत विरोधकांना नेस्तनाबूत करण्याचं काम केलं, म्हणूनच माझ्यावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याची वेळ आली,” असं एकनाथ खडसे म्हणाले.