देशभरात थंडीची हुडहुडीः 27 जणांचा मृत्यू, महाराष्ट्रात येलो तर उत्तरेत रेड अलर्ट जारी
![Thandichi Hudhudi across the country: 27 people died, Maharashtra Yellow and North Red alert issued](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/01/Thandi.jpg)
नवी दिल्ली : मागच्या काही दिवसांपासून उत्तर भारतात थंडी वाढत आहे. दरम्यान उत्तर भारतात थंडीची लाट आल्याने उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, राजस्थान, बिहारसह संपूर्ण उत्तर भारतात नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे. उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये सर्वाधिक कमी तापमानाची नोंद झाली आहे. रात्रीचे तापमान येथे 3.2 सेल्सिअसपर्यंत घसरले होते. मागच्या दोन दिवसांत कानपुरातील दोन सरकारी रुग्णालयांत हृदयविकाराचा झटका आणि ब्रेन स्ट्रोकमुळे 25 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे यावरून थंडीच्या कडाक्याची तीव्रता वाढल्याचे जाणवते.
दरम्यान उत्तर प्रदेशातील सर्वच जिल्ह्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशात डार्क यलो अलर्ट जारी आहे. तर युपीची राजधानी लखनौमध्ये अती थंडीच्या परिणामामुळे शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. उत्तर प्रदेशातील फरिदाबाद येथे एका मेडिकल स्टोअरमध्ये ओआरएस घेण्यासाठी आलेल्या तरुणाला (संजय, वय 23, रा. एटा) काऊंटरवरच हृदयविकाराचा झटका आला आणि तो छातीला हात लावून खाली कोसळला. थंडीमुळे ही घटना घडल्याचे मानले जात आहे.
दिल्लीतही काही भागात किमान तापमान 1.8 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले आहे. अन्य भागांतूनही सरासरी 3 अंश तापमान दिल्लीत आहे. रविवारपर्यंत थंडीचा कडाका कायम राहण्याची शक्यता असून, त्यानंतर पुढील पाच दिवस लोकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे, असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले. दिल्लीतील वातावरणात असणारे प्रदुषण काही प्रमाणात कमी झाले आहे. परंतु हवेची गुणवत्ता सुधारली नसल्याची माहिती देण्यात आली आहे. काही भागांत ‘ऑरेंज’, तर काही भागांत ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील नागपूरमध्येही दोघांचा मृत्यू
देशात कालपासून अचानक थंडीचा कडाका वाढला आहे. देशात प्रामुख्याने उत्तर भारतात अचानक तापमानात घट झाल्याने थंडीचा कडाका वाढला आहे. याचा परिणाम नागपूर आणि परिसरात होत आहे. राज्यात थंड वारे वाहू लागल्याने नागपूरमध्ये अचानक पारा घसरला आहे. नागपूरमध्ये अचानक पारा घसरल्याने नागपूरात कडाक्याच्या थंडीमुळे दोन जणांचा मृत्यू झाल्याचे समजते आहे. दरम्यान पुढच्या दोन दिवसांत राज्यात कडाक्याची थंडी सुरू पडण्याची शक्यता आहे. असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. नागपूर शहरात गेल्या दोन दिवसांत दोन अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे. हे दोन्ही मृत्यू थंडीने झाल्याची शंका व्यक्त केले जात आहे. शहरातील मोरभवन जवळ 70 वर्षीय वृद्ध मृतावस्थेत आढळले आहेत तर गणेशपेठ पोलीस स्टेशन हद्दीत 35 ते 40 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.