मोरवाडीत टँकरचा भीषण अपघात!
केबिनमध्ये अडकलेल्या चालकाची अग्निशमन दलाकडून सुखरूप सुटका
![Terrible tanker accident in Morwadi!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/04/Accident-780x470.jpg)
पिंपरी : जुना पुणे मुंबई महामार्गावर मोरवाडी येथे एका टँकरचा भीषण अपघात झाला. या अपघातात चालक जखमी झाला आहे. केबिनमध्ये अडकलेल्या चालकाची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप सुटका केली. ही घटना शनिवारी (दि.२७) पहाटे अडीच वाजताच्या सुमारास घडली. अंकुश मस्के (वय ४६) असे जखमी चालकाचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी की, अंकुश मस्के हे त्यांच्या ताब्यातील टँकर (एमएच 43/सीई 0784) जुन्या पुणे मुंबई महामार्गावरून घेऊन जात होते. मोरवाडी येथे आल्यानंतर त्यांच्या टँकरला भीषण अपघात झाला. या अपघातात अंकुश मस्के हे केबिन आणि स्टेअरिंगच्या मध्ये अडकले. अपघाताची माहिती मिळताच पिंपरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
अडकलेल्या चालकाला बाहेर काढण्यासाठी पिंपरी पोलिसांनी अग्निशमन विभागाला पाचारण केले. त्यानुसार पिंपरी मुख्य अग्निशमन केंद्र आणि प्राधिकरण उपअग्निशमन केंद्रातील लीडिंग फायरमन विकास नाईक, प्रतीक कांबळे, अमोल चिपळूणकर, अर्जुन जाधव, अभिषेक भांगे, श्री कुटे, श्री कंठाळे आणि इतर कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली.
जवानांनी त्वरित सर्कुलर सॉं, स्प्रेडर, क्रोबार, रोप, रेस्क्यू बेल्ट इत्यादीच्या सहाय्याने अंकुश मस्के यांची सुखरूप सुटका केली. त्यानंतर मस्के यांना रुग्णवाहिकेतून वायसीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या अपघातात टँकर मधील ऑइल रस्त्यावर सांडले. यामुळे वाहने घसरून अपघाताची शक्यता निर्माण झाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी रस्त्यावर सांडलेल्या ऑइलवर माती टाकून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला.