सुषमा अंधारे वारकरी संप्रदायाचा अपमान करताहेत ः आशिष शेलार
![Sushma Andhare Insults Warkari Sect: Ashish Shelar](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/12/ASHISH-SHELAR-780x470.jpg)
मुंबई । महाईन्यूज । प्रतिनिधी ।
गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओमध्ये सुषमा अंधारे संतांबद्दल आक्षेपार्ह विधान करताना पाहायला मिळतायत. त्याच व्हिडीओवरून आता भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरेंवर हल्ला चढवलाय. भाजप नेते आशिष शेलार यांनी ट्विटमध्ये अभंग लिहित सुषमा अंधारेंवर निशाणा साधला आहे.
ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस, अशी अखंड परंपरा असलेला महान वारकरी संप्रदाय हा जगाचा अभ्यासाचा विषय ठरला आहे. …आणि इथे महाराष्ट्रात कोणीतरी कालपरवाच चर्चेत आलेल्या सुषमाताई अंधारे या वारकरी संप्रदायाचा अपमान करतात? वारकऱ्यांच्या श्रद्धेची खिल्ली उडवतात?, उद्धव ठाकरे हा महाराष्ट्र द्रोह नाही का?, असा सवालही आशिष शेलारांनी विचारलाय.
आपली त्यांना मूकसंमती आहे का?, हिंदू देवदेवता आणि संत परंपरेच्या अपमानासाठी सुषमाताईंच्या नेतृत्वात नवी सेना उघडलीय का?, तुम्ही विठ्ठलाच्या पूजेला गेलात आणि पदस्पर्शही केला नाहीत, त्याचाच हा पुढचा टप्पा आहे का?, अशी प्रश्नांची सरबत्ती करत आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर घणाघात केलाय.
काय म्हणाल्या होत्या सुषमा अंधारे?
रेड्याला शिकवण्याचे सामर्थ्य इथल्या संतांमध्ये आहे म्हणून चमत्कार, अरे तुम्ही रेड्यांना शिकवलं रे, माणसांना कोण शिकवणार, माणसांना नाही शिकू दिलं, यांची संस्कृती कशी रेड्याला शिक शिक म्हणून मागे लागतायत, माणसाला शिकू द्यायचे नाही, कुत्र भाकर घेऊन गेलं तर तुपाची वाटी राहिली म्हणून त्याच्या मागे हे लोक, तूप खा तूप खा, नुसतीच रोटी कशी खातो तूप खा, असं सुषमा अंधारे व्हिडीओमध्ये म्हणताना दिसत आहेत.