पुढील 3 महिने सूर्य ओकणार आग, ‘या’ राज्यांना सतर्कतेचा इशारा

IMD Weather Update : भारतीय हवामान विभागानं (Imd) महत्वाची माहिती दिली आहे. एप्रिल ते जून या कालावधीत भारतातील तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. मध्य आणि पूर्व भारत तसेच उत्तर-पश्चिम मैदानी भागात उष्णतेची लाट अधिक दिवस टिकून राहू शकते. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) आज (31 मार्च 2025) ही माहिती दिली आहे.
IMD चे प्रमुख मृत्युंजय महापात्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम आणि पूर्व भारतातील काही भाग वगळता देशातील बहुतांश भागात कमाल तापमान सामान्यपेक्षा जास्त असेल. या दोन्ही भागात तापमान सामान्य राहण्याची शक्यता आहे. एप्रिल ते जून या काळात उत्तर आणि पूर्व भारत, मध्य भारत आणि उत्तर-पश्चिम भारताच्या मैदानी भागात उष्णतेची लाट सामान्यपेक्षा दोन ते चार दिवस जास्त राहण्याची शक्यता आहे. साधारणत: एप्रिल ते जून या काळात भारतात चार ते सात दिवस उष्णतेची लाट असते.
बहुतांश भागात किमान तापमानही सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. आयएमडीच्या एका अधिकाऱ्याने यापूर्वी सांगितले होते की उत्तर-पश्चिम भारतात उन्हाळ्यात उष्णतेच्या लाटेच्या दिवसांची संख्या दुप्पट होऊ शकते. या प्रदेशात उन्हाळी हंगामात साधारणपणे पाच ते सहा दिवस उष्णतेच्या लाटा राहतात.
हेही वाचा – “त्यांनी मांडलेला विचार महत्वाचा…”; ठाकरेंच्या मुद्द्याला ‘शिंदे’ची साथ !
ज्या राज्यांमध्ये उष्णतेची लाट सामान्यपेक्षा जास्त दिवस राहण्याची शक्यता आहे त्यामध्ये राजस्थान, गुजरात, हरियाणा, पंजाब, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, छत्तीसगड, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक आणि तामिळनाडूच्या उत्तरेकडील भागांचा समावेश आहे.
एप्रिलमध्ये भारतातील बहुतांश भागात कमाल तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची अपेक्षा आहे. दक्षिणेकडील आणि उत्तर-पश्चिम भागातील काही भागात तापमान सामान्य राहू शकते. उत्तर-पश्चिम आणि ईशान्येकडील काही ठिकाणे वगळता देशातील बहुतांश भागात किमान तापमान सामान्यपेक्षा जास्त असेल, जेथे तापमान सामान्य किंवा किंचित कमी असू शकते अशी माहिती महापात्रा यांनी दिली.
यंदाच्या उन्हाळ्यात विजेच्या मागणीत 9 ते 10 टक्के वाढ होण्यासाठी भारताने तयार राहावे, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. गेल्या वर्षी, 30 मे रोजी देशभरातील सर्वोच्च वीज मागणी 250 GW च्या वर गेली होती, जी आधीच्या अंदाजापेक्षा 6.3 टक्के अधिक होती. हवामानातील बदल हा विजेची मागणी वाढवणारा एक प्रमुख घटक आहे.