breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रत्नागिरी जिल्ह्यात शिमगोत्सवावर कडक निर्बंध

रत्नागिरी – राज्याच्या विविध भागांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा झपाट्याने वाढ होत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने यंदाचा शिमगोत्सव साजरा करण्यावर जिल्हा प्रशासनाकडून निर्बंध जारी करण्यात आले आहेत. या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोकणात शिमगोत्सवाला प्रारंभ होणार आहे. कोकणवासियांच्या दृष्टीने गणपतीइतकाच महत्त्वाचा असलेल्या या उत्सवासाठी चाकरमानी आपापल्या गावी येऊन मोठ्या उत्साहाने हा सण साजरा करतात. त्याचप्रमाणे शिमग्यानंतर ग्रामदेवतेची पालखी घरोघरी जाते. तेथे अतिशय भक्तीभावाने पूजाअर्चा केली जाते. मात्र उत्सव साजरा करण्याच्या या पद्धतीत ग्रामस्थ मोठ्या संख्येने एकत्र येतात. यंदा या गर्दीतून कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने हा उत्सव साजरा करण्याबाबत निर्बंध जारी केले आहेत.

जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी या संदर्भात गुरुवारी जाहीर केलेल्या आदेशानुसार गावातील मंदिराचे विश्वस्त आणि पालखीधारकांसाठी कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. मोजक्या लोकांच्या उपस्थितीत ग्रामदेवतेच्या पालखीची रुपे लावणे, सजवण्याचा कार्यक्रम करावयाचा असून २५ ग्रामस्थ आणि मानकर्‍यांच्या उपस्थितीत पालखी परंपरेनुसार भेट होईल. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पालखी शक्यतो वाहनातून नेणे अपेक्षित आहे. ते शक्य नसल्यास पालखीधारकांनी स्वतः वाहून न्यावी. मात्र पालखीबरोबर ५० पेक्षा जास्त लोकांनी जमू नये. सालाबादप्रमाणे ग्रामदेवतेची पालखी घरोघरी नेण्यास बंदी किंवा गर्दीमध्ये नाचवण्यास बंदी आहे. छोट्या होळ्या आणून मोजक्या लोकांच्या उपस्थितीत परंपरेनुसार होम करावा. गर्दी टाळण्यासाठी पालखी दर्शनाच्या वेळा निर्धारित करून घ्याव्यात. होळी व पालखीची पूजा, नवस, पेढे, हार, नारळ आदी स्वीकारू नयेत आणि प्रसादाचे वाटप करू नये. सहाणेवर पालखी आणि होळीच्या दर्शनासाठी प्रत्येक वाडीतील, भागातील लोकांना स्वतंत्र दिवस नेमून द्यावा किंवा कालावधी निश्‍चित करावा, इत्यादी सूचना जिल्हा प्रशासनाने केल्या आहेत. तसेच हे सर्व करताना सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर, थर्मल स्क्रिनिंग आणि सॅनिटायझरचा वापर बंधनकारक आहे.

महत्त्वाचे म्हणजे मुंबईसह बाहेरगावी असलेल्या ग्रामस्थांना शक्यतो गावी न येण्याचे आवाहन करावे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले असून होळीच्या कार्यक्रमाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, फेसबुक, संकेतस्थळ इत्यादी माध्यमांद्वारे उपलब्ध करुन द्यावी, असे सुचवण्यात आले आहे. त्याचबरोबर मुंबई, पुणे किंवा अन्य भागातील कंटेन्मेंट झोनमधून रत्नागिरीत या सणासाठी येणार्‍या नागरिकांकडे त्यांची ७२ तासांपूर्वीची कोरोना चाचणी नकारात्मक असल्याचा अहवाल असणे आवश्यक आहे. तर कंटेन्मेंट झोनबाहेरील नागरिकांना नियमित चाचणी व थर्मल स्क्रिनिंग बंधनकारक राहणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button