एसटी महामंडळाचा नवा उपक्रम; राज्यभर २५० ठिकाणी पेट्रोल, डिझेल, सीएनजी पंप उभारणार

पुणे : उत्पन्नाचा नवा स्रोत निर्माण करण्याच्या उद्देशाने राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) राज्यभरातील स्वतःच्या जागांवर व्यावसायिक तत्त्वावर पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी (किरकोळ विक्री) पंप उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या माध्यमातून आर्थिक तूट भरून काढत महसुलात वाढ साध्य करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
सरनाईक म्हणाले की, “एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक आहे. प्रवासी तिकीट विक्रीवरच महसुलासाठी अवलंबून राहणे कठीण झाले आहे. त्यामुळे उत्पन्नाचे नवे स्रोत शोधणे गरजेचे ठरले आहे.”
गेल्या सात दशकांपासून एसटी महामंडळ इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियमकडून डिझेल इंधन विकत घेत आहे. सध्या २५१ ठिकाणी एसटीने स्वतःच्या जागांवर पंप उभारले असून, त्यांचा वापर केवळ एसटी बसेससाठी केला जातो. या अनुभवाच्या आधारे आता सर्वसामान्य ग्राहकांसाठीही पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि इलेक्ट्रिक चार्जिंग पॉइंट असलेले पंप उभारण्याची योजना आहे.
हेही वाचा – निवडणुका जाहीर होताच महाविकासाआघाडीत बिघाडी, राष्ट्रवादी शरद पवार गटाचा काँग्रेसला दे धक्का
राज्यभरातील मोक्याच्या ठिकाणावरील एसटीच्या मालकीच्या जागांचे सर्वेक्षण करून २५० पेक्षा जास्त ठिकाणी प्रत्येकी ४० बाय ३० मीटर क्षेत्र निश्चित करण्यात आले आहे. या ठिकाणी इंधन विक्री केंद्राबरोबरच किरकोळ दुकाने उभारण्यात येणार आहेत. यामुळे अन्य व्यावसायिक उपक्रमांनाही संधी उपलब्ध होणार असून, सार्वजनिक-खासगी भागीदारीतून महामंडळाला चांगला महसूल मिळण्याची अपेक्षा आहे.
सरनाईक यांनी सांगितले की, “खुल्या निविदा प्रक्रियेद्वारे इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम यांच्यासह देश-विदेशातील नामांकित इंधन कंपन्यांना ‘पेट्रो-मोटेल हब’ उभारण्यासाठी आमंत्रित केले आहे. या केंद्रांवर एसटी बसेससह सर्वसामान्य ग्राहकांनाही इंधन भरण्याची सुविधा मिळेल.”
“या उपक्रमामुळे सर्वसामान्यांना विश्वासार्ह इंधन विक्री केंद्र उपलब्ध होईल आणि एसटी महामंडळालाही नव्या उत्पन्नस्रोताचा मार्ग खुला होईल,” असे सरनाईक यांनी सांगितले.




