“आवाज रावडी राठोडसारखा…,” भास्कर जाधवांनी अरेरावी केल्यानंतर महिलेची पहिली प्रतिक्रिया
मुंबई |
शिवसेना आमदार भास्कर जाधव सध्या चर्चेत असून विरोधकांच्या निशाण्यावर आहेत. मुख्यमंत्र्यांच्या चिपळूण दौऱ्यात भास्कर जाधव यांनी मदत मागणाऱ्या महिलेसोबत केलेले अरेरावी याचं मुख्य कारण आहे. आपल्याला मदत करा, हवं तर आमदारांचा एक दोन महिन्याचा पगार देऊ नका अशी विनंती करणाऱ्या महिलेसोबत भास्कर जाधव यांनी अरेरावी केली. आमदारांचा सहा महिन्यांचा पगार दिला नाही तरी काही फरक पडत नाही सांगत महिलेच्या मुलाला आईला समजाव असं सांगतानाचा त्यांचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. दरम्यान या संपूर्ण वादावर महिलेने एबीपी माझाशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.
स्वाती भोजने असं या महिलेचं नाव आहे. स्वाती यांनी भास्कर जाधव यांची बाजू घेताना ते उद्धटपणे बोलले नाहीत असं म्हटलं आहे. “अजूनही आमच्याकडे लाईट नाही, मोबाइल चार्ज नाही त्यामुळे सोशल मीडियावर नेमका काय प्रचार सुरु आहे हे मी पाहिलेलं नाही. पण ते उद्धटपणे बोलले नाहीत. वडिलकीच्या नात्याने बोलले आहेत,” असं स्वाती यांनी सांगितलं. त्यांचे आणि आमचे चांगले संबंध आहेत असंही यावेळी त्यांनी म्हटलं. “त्यांचा आवाजच रावडी राठोडसारखा असल्याने गैरसमज होता. त्यांचं बोलणं कठोर आहे. त्यामुळे चुकीचा अर्थ काढण्याची गरज नाही. माझ्या मुलाला आईची काळजी घे नंतर येऊन भेटतो असं ते म्हणाले. प्रत्येकवेळी ते मदत करतात, येऊन भेटतात,” असंही त्यांनी सांगितलं. “माझ्यावर कोणताही दबाव नाही. दबाव असता तर आमदार, खासदारांचा पगार काढला नसता. त्यांच्याबद्दल वाईट बोलण्याचं काही कारण नाही,” असंही त्यांनी म्हटलं आहे.