श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टकडून पूरग्रस्तांसाठी १ कोटींचा निधी

पुणे | ‘मानवसेवा हीच ईश्वरसेवा’ हे ब्रीद अंगीकारून कार्यरत असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट तर्फे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी १ कोटी रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुपूर्द करण्यात आला. तसेच सुवर्णयुग सहकारी बँकेकडून २५ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांवर आलेल्या आसमानी संकटाच्या पार्श्वभूमीवर, जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाला हा मदतीचा हात देण्यात आला आहे.
मुंबई येथे हा धनादेश सुपूर्द करण्यात आला. या वेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस आणि आमदार हेमंत रासने, सहचिटणीस अमोल केदारी, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, सहकार्याध्यक्ष सचिन आखाडे, संघटक मंगेश सूर्यवंशी, तुषार रायकर, अंकुश रासने, प्रतीक घोडके, सुवर्णयुग सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश परदेशी, तसेच तुकाराम रासने आदी उपस्थित होते.
हेही वाचा : पुण्यात रात्री दहानंतर फटाके वाजविण्यास बंदी; पोलीस आयुक्तांचा आदेश
ट्रस्टचे सरचिटणीस आणि आमदार हेमंत रासने म्हणाले, “आपला शेतकरी दिवस-रात्र मेहनत करून सर्वांना अन्नधान्य पुरवतो. कोरोनासारख्या संकटातही खंबीरपणे उभा राहिलेला बळीराजा आज अतिवृष्टीच्या तडाख्याने हवालदिल झाला आहे. या संकटाच्या काळात त्याला आधार देणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांतून नक्कीच शेतकऱ्यांना दिलासा मिळेल आणि तो पुन्हा उभारी घेईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दगडूशेठ गणपती ट्रस्टने यापूर्वी कोयना आणि लातूर भूकंपासारख्या आपत्तींच्या काळात, तसेच माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या कार्यकाळातही आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना मदत केली आहे. मुख्यमंत्री सहायता निधीस वेळोवेळी आर्थिक मदत देत ट्रस्टने सामाजिक संवेदनशीलतेचा आदर्श घालून दिला आहे.
विविध संस्थांकडून लाखोंची मदत…
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ‘मुख्यमंत्री सहायता निधी’मध्ये सुवर्णयुग सहकारी बँकेकडून २५ लाख, मराठी बांधकाम व्यावसायिक संघटना पुणेच्या वतीने ५१ लाख ५१ हजार, बँक ऑफ इंडिया स्टाफ युनियन यांच्या माध्यमातून ५ लाख, कासार सोशल ग्रुप पुणेच्या वतीने १ लाख २१ हजार, विठ्ठल दिनकर बोरकर यांच्या माध्यमातून १० हजार रुपये तसेच चंद्रशेखर तुकाराम झेडगे यांच्या माध्यमातून ५ हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुपूर्द करण्यात आला.





