धक्कादायक! महाराणा कबड्डी संघातील दोन खेळाडूंचा अपघातात मृत्यू, सहा जखमी
भवानीनगर – कबड्डी स्पर्धेसाठी कर्नाटकातील विजापूरपासून वीस किलोमीटर असलेल्या बेडगी या गावाकडे निघालेल्या इंदापूर तालुक्यातील खेळाडूंच्या गाडीची कंटेनरशी धडक होऊन दोन जण ठार झाले, तर सहा जण गंभीर झाले आहेत. या सर्वांना विजापूरमधील बंजारा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
सर्व जखमींना विजापूर येथील बंजारा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत अशी माहिती डॉक्टरांनी दिली. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार रोहित पवार यांच्या कार्यालयाने तेथे मदत मिळण्यासाठी पाठपुरावा केला. पुणे जिल्ह्याचे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी देखील विजापूरच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांशी बोलून यासंदर्भात उपचार आणि शवविच्छेदनाच्या संदर्भातील प्रक्रिया याविषयी चर्चा केली.
महाराणा कबड्डी संघातील महादेव आवटे हा खेळाडू भवानीनगर येथील होता तो दोन वेळचा राष्ट्रीय चॅम्पियन होता व कबड्डीपटूंना प्रशिक्षण देत होता. त्याला पोलीस बनायचे होते मात्र त्याचे हे स्वप्न अधुरे राहिले. त्याच्या निधनाने परिसरावर शोककळा पसरली आहे.