धक्कादायक! शिवसेनेच्या रणरागिणीचं कोरोनामुळे निधन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/04/Kalpana-Pande-Nashik.jpg)
नाशिक – शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका कल्पना पांडे यांचे कोरोनामुळे निधन झालं आहे. आज पहाटेच्या सुमारास कल्पना पांडे यांची प्राणज्योत मालवली. कल्पना पांडे या नाशिक प्रभाग क्रमांक 24 चे प्रतिनिधित्व करत होत्या.
कल्पना पांडे यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर नाशिकमध्ये एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने शिवसैनिकांना जबरदस्त धक्का बसला आहे.
नाशिक महापालिका निवडणुकीत त्या सलग चार वेळा निवडून आल्या होत्या. कल्पना पांडे यांनी सिडको प्रभाग सभापती म्हणून दोन वेळा काम पाहिले आहे. तसेच नाशिक महापालिकेतील अनेक समित्यांवरही त्यांनी काम केलं आहे. कोरोना काळात कल्पना पांडे /यांनी रुग्णाला रुग्णालय मिळवून देणं, औषधाची सोय करणं, जनजागृती करणं, यासारखी अनेक कामं केली.
दरम्यान, राज्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. पुण्यातही कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होतेय. रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्यामुळे पुण्यातील रुग्णालयेही आता अपुरी पडू लागली आहे.