धक्कादायक! घराशेजारी थुंकला, नातेवाईकानेच केली १३ वर्षांच्या मुलाची हत्या
![धक्कादायक! घराशेजारी थुंकला, नातेवाईकानेच केली १३ वर्षांच्या मुलाची हत्या](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/04/375428-pan-masala-spitting.jpg)
ठाणे |
घराशेजारी थुंकत असल्याच्या कारणावरून १३ वर्षांच्या मुलाची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार दिव्यात घडला आहे. या हत्येप्रकरणी मुंब्रा पोलिसांनी या मुलाच्या लांबच्या एका नातेवाइकाला अटक केली आहे. न्यायालयाने आरोपीला २५ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.
रूपेश विजय गोळे (वय १३) असे हत्या झालेल्या मुलाचे नाव आहे. दिव्यातील नागवाडीमध्ये या मुलाच्या घराशेजारीच या मुलाचा नातेवाइक असलेला आरोपी दशरथ काकडे (२८) राहतो. काकडेच्या मामाचा मुलगा रूपेशच्या वयाचा आहे. त्याला कपडे आणण्यासाठी काकडे रूपेशला १७ एप्रिलला दुपारी घेऊन गेला होता. मात्र, त्यानंतर रूपेश घरी आलाच नाही. त्यामुळे रूपेशच्या मोठ्या भावाने दशरथला फोन करून रूपेशविषयी विचारणा केली.
तर रूपेशला ५० रुपये देऊन जत्रेमध्ये सोडले असल्याचे त्याने सांगितले. तरीही रूपेशचा पत्ता नसल्याने दुसऱ्या दिवशी पहाटे मुंब्रा पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास करत असताना, नेमके कपडे खरेदीसाठी कोठे गेले होते, याबाबत दशरथकडे पोलिसांनी चौकशी केली. त्यावेळी रस्त्यावरील विक्रेत्याकडे कपडे घेण्यासाठी गेल्याचे त्याने सांगितले. परंतु, पोलिसांनी त्या विक्रेत्याकडे चौकशी केल्यानंतर कपडे खरेदीसाठी कोणी आले नसल्याचे विक्रेत्याने सांगितले. संशयावरून या गुन्ह्यात पोलिसांनी दशरथला अटक केली. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर रूपेशची हत्या केल्याची बाब समोर आली.
दिव्यातील बंद असलेल्या एका शौचालयाच्या पहिल्या मजल्यावर दशरथ रूपेशला घेऊन गेला होता. नंतर त्याने रूपेशची गळा दाबून हत्या केली. १७ एप्रिलला दुपारी ही हत्या करण्यात आल्याची माहिती त्याने पोलिसांनी दिली. दशरथच्या घराशेजारी रूपेश थुंकत असल्याच्या रागातून या दोघांमध्ये वादही झाले होते. याच रागातून आरोपीने रूपेशची हत्या केली. आरोपी रंगकाम करत असून, रूपेशच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक एस. एस. शेळके करीत आहेत.