धक्कादायक! खंबाटकी घाटातील वणव्यात रसायनाचा ट्रक आणि मोटार जळून भस्मसात
![Shocking! Chemical truck and motor burnt in Khambhatki Ghat forest](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/04/fire-670x302-1.jpg)
वाई |
पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकी घाटात डोंगराला आज आग लागली होती. दुपारी डोंगरात वणवा पेटलेला असताना वाहतूकही सुरु होती. वनव्याच्या आगीची झळ बसून, घाटातून जाणारा एक ट्रक व एक मोटारीला आग लागून ही दोन्ही वाहने जळून मोठे नुकसान झाले आहेत. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकी घाटातील डोंगरात आज दुपारी वणवा पेटला होता. दत्त मंदिरासमोरील वळणावर वाळलेलं गवत जळत असताना आग भडकली. आगीचा भडका उडाल्यानंतर घाटातून जाणारी वाहतूक प्रभावित झाली. यावेळी वणव्याच्या आगीने पुण्याहून साताऱ्याकडे जाणारा रासायनिक मालाची वाहतूक करणारा एक ट्रक व त्याच्या मागे असणाऱ्या मोटारीला आग लागली.
यावेळी आग विझवणारी यंत्रणा लगेचच उपलब्ध होऊ न शकल्याने दोन्ही वाहने पूर्णतः जळून गेली. या आगीचे लोट मोठे असल्याने यावेळी घाटातून जाणाऱ्या प्रवाशांची भीतीने भंबेरी उडाली. या अग्नितांडवाची माहिती मिळताच सर्वत्र एकच खळबळ उडाली . घटनेचे गांभीर्य ओळखून अग्निशमक दल व खंडाळा ,भुईंज व महामार्ग पोलिसांनी व अग्निशामक यंत्रणा घटनास्थळी धाव घेतली. दोन वाहने पेटल्यानं घाटात मोठ्या प्रमाणात वाहतूक खोळंबली आहे. बुधवारी दुपारी दोन वाजता घाटातून धुराचे लोट दिसू लागले. दरम्यान, काही क्षणातच आगीचे व धुराचे प्रमाण वाढल्याने प्रवाशी आणि वाहनधारक भीतीच्या सावटाखाली आले होते. आगीमुळे वाहतूक खोळंबल्याने घाट रस्त्यावर वाहनांची कोंडी झाली आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव वाहतूक बोगद्यातून साताऱ्याकडे वळवण्यात आली आहे. अग्निशामन दलाला आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले आहे.