धक्कादायक! मद्यविक्रेत्यांकडून पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण; पाच जण अटकेत
![Fighting in front of Chinchwad police station ...](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/06/marhan-40_201906251791.jpg)
डहाणू |
बेकायदा मद्यची वाहतूक करणाऱ्या वाहनाचा पाठलाग करणाऱ्या तलासरी पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्याला मारहाण करण्याचा प्रकार शनिवारी घडला. या प्रकरणी घोलवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही मारहाण परराज्यातून विनापरवानगी दारुची वाहतूक करणाऱ्या मद्य विक्रेत्यांच्या स्पर्धेतून झाल्याचे स्थानिक नागरिकांकडून सांगितले जाते. तलासरी पोलीस ठाण्याचे पोलीस सहाय्यक पोलीस जमादार रामचंद्र डांगे ( ५४) यांना मारहाण झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी वेवजी येथील पाच जणांना अटक केली आहे. त्यांना १० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.पोलीस तपास करीत आहेत.
परराज्यातील बेकायदा दारु महाराष्ट्रात आणून विक्री करणारे अनेक किरकोळ विक्रेत्यांचे जाळे असून ते काही स्थानिक पोलिसांना हप्ता देऊन हा व्यवसाय करीत असल्याचे एका विक्रेत्याने सांगितले. मासिक हप्ता देऊनही पोलीस वाहने थांबवत असल्याच्या प्रकरणातून प्रकार घडल्याची माहिती मिळते. याबाबत तलासरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक अजय वसावे यांनी हा प्रकार घोलवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला असल्याचे सांगून माहिती देण्याचे टाळले. त्यामुळे तलासरीतील पोलीस कर्मचाऱ्याची वेवजी येथे घोलवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या मारहाणीमागे अन्य कारण असल्याचे बोलले जाते.
वाचा- शिवसेनेचे मंत्री अडचणीत येणार? किरीट सोमय्यांची लोकायुक्तांकडे तक्रार