शिवसेनेचा इशारा! ‘ईडी’ने याप्रकरणी डोळे मिटून दूध पिण्याचे ठरवले असेल तर…
![Shiv Sena's warning! If the ED decides to drink milk with its eyes closed in this case](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/07/ED_enfor.jpg)
मुंबई |
“कायदेशीर झालेल्या गोष्टी बेकायदेशीर ठरविण्याचा नवा उपदव्याप म्हणजे घटनेला पायाखाली तुडविण्यासारखेच आहे. भाजपचे ‘उपरे’ पुढारी प्रसाद लाड यांच्या नातेवाईकांच्या कंपनीचा कोटय़वधी रुपयांचा स्मार्ट सिटी घोटाळा समोर आला आहे. त्यांच्या क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस प्रा.लि. या कंपनीने सरकारी पैशाचा केलेला अपहार 100 कोटींच्या वर आहे. ‘ईडी’ने तत्काळ त्याची दखल घेऊन गुन्हा नोंद करावा व अनिल देशमुख, प्रताप सरनाईक यांच्याप्रमाणे या कंपनीच्या मालकांनाही समन्स पाठवावे, असे हे गंभीर प्रकरण आहे.
‘ईडी’ने याप्रकरणी डोळे मिटून दूध पिण्याचे ठरवले असेल तर राज्याच्या आर्थिक गुन्हे विभागाने तत्काळ कारवाई करावी,” अशी मागणी शिवसेनेने केली आहे. “विधिमंडळाच्या अधिवेशनात सरकारची कोंडी करणाऱया विरोधी पक्षाच्या या उद्योगांचाही भंडाफोड होणे गरजेचे आहे. विरोधी पक्ष कोणत्या मुद्दय़ांवर व गुद्दय़ांवर सरकारची कोंडी करणार आहे? जरूर करा, पण त्याआधी तुमच्या पार्श्वभागाखाली कोणत्या मुद्दय़ांना मोड फुटलेत तेही पाहा. विधिमंडळाच्या दोन दिवसांच्या अधिवेशनाने लोकांच्या प्रश्नांना वाचा फुटावी इतकीच अपेक्षा!,” असं शिवसेनेने म्हटलं आहे.